आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याचे काम न करणा-या ठेकेदारांना काढून टाका- खासदार खैरें

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पैस नाही, पैसे नाही म्हणून ओरडता, मग काम घेतले कशाला? लोकांचे जीव जात आहेत, ठेकेदार काम करत नसतील, तर त्यांना लाथा मारून काढून द्या! असे उद्गार खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज काढले.
दोन वर्षांपासून क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्त्याचे काम सुरू आहे, अजून पूर्ण झालेले नाही. लोक आम्हाला शिव्या घालतात, औरंगाबाद पश्चिमच्या मतदानावर त्याचा परिणाम झाला, असे जाहीर सांगत खैरे यांनी मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांना रस्ता 1 जानेवारीपर्यंत तयार झाली पाहिजे, अशी नवीन डेडलाइन दिली.
क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्त्याचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. मंदगतीने होत असलेल्या या कामाबद्दल सातत्याने ओरड होत आहे. नागरिक मेटाकुटीला आले असून आता तर खोदकामामुळे अपघातही सुरू झाले आहेत. गेल्या आठवड्यात दोन अपघात झाले व त्यात दोन जणांचे बळी गेले. याशिवाय आतापर्यंत किरकोळ अपघातात जखमी होऊन हात पाय मोडण्याच्या 50 हून अधिक घटना घडल्या आहेत.
खासदार पायी फिरले
अपघातांची दखल घेत काल स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे यांनी बैठक घेतली होती. आज लगेच खासदार चंद्रकांत खैरे यांनी या रस्त्याची पाहणी केली. रेल्वेस्टेशनपासून पदमपुरा चौकापर्यंत त्यांनी पायी जात रस्त्याच्या कामांची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत मनपा आयुक्त प्रकाश महाजन, महापौर कला ओझा, स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे, नगरसेवक गजानन बारवाल, अनिल जैस्वाल, नंदकुमार घोडेले, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता बी.डी. फड, ठेकेदारांचे प्रतिनिधी व मनपाचे अधिकारी उपस्थित होते.
काम कशाला घेता?
रेल्वेस्टेशनसमोर रस्त्याच्या कामामुळे ड्रेनेजचे पाणी साचले आहे. तेथे जाऊन खासदार खैरे यांनी लगेच हेमंत कोल्हे, बी. डी. फड व पानझडे यांना झापायला सुरुवात केली.' रस्त्याची काय अवस्था केली आहे? लोक कमिशनर, शहर अभियंत्याला बोलत नाहीत, लोक आम्हाला शिव्या घालतात. हे ठेकेदार पैसे नाही, पैसे नाही म्हणून ओरडतात; मग काम घेतले कशाला? लोकांचे जीव जात आहेत. ठेकेदार काम करीत नसतील तर लाथा मारून त्यांना काढून द्या! ' असे त्यांनी ठणकावले. त्‍यानंतर आलेल्या महापौर व आयुक्तांना त्यांनी पुन्हा एकदा रस्त्याच्या कामाबाबत गांभीर्याने लक्ष घालण्याच्या सूचना केल्या.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
रस्त्याच्या खोदकामामुळे अपघात होत आहेत. एक तर रस्ता पूर्ण नाही, खांब, पथदिवे नाहीत, लोकांनी जायचे कसे, असे विचारत त्यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातांत दोन जण मरण पावल्याचा उल्लेख करीत याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, असे आयुक्तांना सुनावले.