आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज वितरणासाठी शहरामध्ये फ्रँचायझी येऊ देणार नाही, विद्युतीकरण समितीचे अध्यक्ष खा. खैरे यांची ग्वाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गत साडेतीन वर्षे शहर वीज वितरण प्रणाली जीटीएलकडे देण्यात आली होती. या कंपनीला वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्यात अपयश आले. महावितरणचे कोट्यवधी रुपये थकवले आहेत. यामुळे त्यांचा करार रद्द करण्यात आला. आता यापुढे शहरात फ्रँचायझी येऊ देणार नाही, अशी ग्वाही खासदार तथा जिल्हा विद्युतीकरण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खैरे यांनी वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या कार्यशाळेत बोलताना दिली.
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने पैठण गेट येथील सलीम कुरेशी सभागृहात तांत्रिक कामगारांची कार्यशाळा पार पडली. यामध्ये मार्गदर्शन करताना खैरे पुढे म्हणाले की, ग्राहकांना चांगली सेवा मिळायला हवी. त्यासाठी काही पायाभूत सुविधा करणे आवश्यक आहे. त्याचा महावितरणने प्राधान्याने विचार करून विकास कामे हाती घ्यावीत. खासगीकरणामुळे काय हाल होतात हे जीटीएलने दाखवून दिले. आता फ्रँचायझी होऊ देणार नाही. वीज कर्मचाऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडे घालून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आमदार अतुल सावे यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. आमदार प्रशांत बंब म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. त्यांना सुरळीत व वेळेवर आणि पुरेशी वीज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. यामुळे शेतकरी व वीज तांत्रिक कामगारांचे नाते अतूट आहे याचे भान ठेवून शेतकऱ्यांना चांगली सेवा द्या.

या वेळी मुख्य अभियंता शंकर शिंदे आणि संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे उद्घाटन खैरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी एन. के. मगर, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सावे, बंब, मुख्य अभियंता शिंदे, कार्यकारी अभियंता अर्शद पठाण, एम. आर. शेवाळे, व्यवस्थापक प्रकाश अहिरे, श्रीकृष्ण वायदंडे, सुनील जाधव, रेखा भाले, सय्यद जहिरोद्दीन, आर. पी. थोरात, भाऊसाहेब भाकरे, कोशाध्यक्ष टी. डी. कोल्हे, प्रभाकर लोखंडे, कोअर कमिटी सदस्य श्रावण कोळनूरकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल पुरी यांनी तर आभार प्रभाकर लोखंडे यांनी मानले.