आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खा. चंद्रकांत खैरे यांचे पक्षात ठरवून ‘एकला चलो रे’!, का निघाले एकटेच?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गट-तटासाठीप्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याच्या शिवसेनेत आता खासदार चंद्रकांत खैरे विरुद्ध सर्व असे चित्र आहे. आपल्याला एकटे पाडण्यात आल्याची जाणीव झाल्यानंतर खैरे यांनी मुद्दाम ‘एकला चलो रे’चा फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे. नाराजी असली तरी खैरे यांनी सांगितल्यास सर्व पदाधिकारी कार्यक्रमास हजर राहतील, हे खैरे यांनाही माहिती आहे. तरीही मीच मोठा नेता आहे, हे दाखवण्यासाठी त्यांनी आपणहून स्थानिक पदाधिकाऱ्यांना दूर ठेवण्याचा सपाटा लावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
पालकमंत्री म्हणून रामदास कदम यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी संघटनेवरही ताबा घेतल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले. तेव्हापासूनच खैरे यांच्या येथील एकहाती कारभाराला घरघर लागली. खैरे यांच्या कारभाराचा फटका जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांना बसला. दुसरीकडे कदम यांच्या रूपाने बिनधास्त नेता लाभल्याने सर्वजण खैरेंच्या तंबूतून बाहेर पडले.
मातोश्रीवर जायचे असेल तर खैरेंची परवानगी अनिवार्य अशी एक वेळ परिस्थिती होती. परंतु आता तशी गरज राहिली नाही. यावरून खैरे यांचे येथील स्थान कसे झाले असेल, याची कल्पना येते. बजाजनगर येथील मंदिर पाडण्याचा मुद्दा खैरे यांना मिळाला. आपल्या मतदारसंघातील या मुद्द्याकडे आमदार संजय शिरसाट यांनी काहीसे दुर्लक्ष केले. परंतु खैरे यांनी त्यांचे भांडवल करण्याचे ठरवल्याचे पहिल्याच दिवशी समोर आले होते. अन्य कोणीही पदाधिकारी तिकडे फिरकला नाही. तेव्हा खैरे यांनी तहसीलदाराला शिवीगाळ करून हा मुद्दा उचलला. या मुद्द्याने खैरे यांची देशभर प्रसिद्धी झालीच, शिवाय जिल्ह्यातून मीच खरा हिंदुत्ववादी असल्याचा संदेश देण्यात ते यशस्वी झाले. तेव्हापासूनच खैरे यांनी यापुढे आपण एकटेच पुढे जायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी काही जणांशी चर्चाही केल्याचे सांगण्यात येते.

संघटनेतील अन्य कोणीही सोबत नसताना खैरे यांच्या मुद्द्याला मिळत असलेली प्रसिद्धी लक्षात आल्याने त्यांना आता कोणाचीही संगत नको, असे ठामपणे ठरवले. त्यांचे एकमेव समर्थक नगरसेवक नंदकुमार घोडेले हे आहेत. परंतु ते उपजिल्हाप्रमुख असल्याचे वारंवार खैरे सांगत आहेत. घोडेले, नगरसेविका पती वीरभद्र गादगे किशोर नागरे वगळता खैरे यांच्यासमवेत सध्या कोणीही नाही अन् ही संख्या वाढता कामा नये, असे खैरे यांनीही ठरवल्याचे पुढे आले आहे.

शिरसाटांना विरोध
जिल्ह्यातआणखी कोणी मोठा होणार नाही, याची खबरदारी खैरे यांनी वेळोवेळी घेतली आहे. आता शिरसाट यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा सुरू झाली तेव्हा खैरे यांनी शिरसाट यांना विरोध करण्याबरोबरच जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची तळी उचलली. जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले तर पक्षाचे सत्ताकेंद्र तिकडे सरकू शकते, याची जाणीव झाल्याने शिरसाट यांना विरोध केला.
सेनेकडून जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचे मोठे अभियान हाती घेण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रमुख नेते या न्यायाने खैरे यांना यात मोठे स्थान असायला हवे होते. परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. पालकमंत्री कदम, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल या मंडळींनी हे अभियान पुढे रेटले. तरीही खैरे ‘लाइमलाइट’मध्ये कायम राहिले. त्यातच मंदिरांचा मुद्दा त्यांना आणखीनच प्रसिद्धी देऊन गेला. त्यामुळे एकट्यानेच याचे श्रेय घेण्याचे त्यांनी ठरवले. जिल्ह्यात मीच नेता आहे, हे त्यांना या माध्यमातून दाखवून द्यायचे आहे. सर्व संघटना बाजूला असल्या तरी आपण एकट्यानेच हा किल्ला लढवायचा असा त्यांचा मनसुबा आहे.