आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरेंच्या विरोधकांना सचिन-ऋषिकेश यांचे साकडे, पूर्वीचे झाले-गेले विसरून जा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- येत्या २२ एप्रिलला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीची लढत नेमकी कोणाकोणात होणार हे शुक्रवारी स्पष्ट झाले. त्यानंतर सायंकाळपासूनच खऱ्या प्रचाराला सुरुवात झाली असून उमेदवारांनी आपल्या वाॅर्डातील विरोधकांच्याही भेटी-गाठी सुरू केल्या आहेत.
झाले-गेले विसरून जा, मला संधी द्या, असे म्हणत ही मंडळी कामाला लागली आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांचे पक्षांतर्गत विरोधक जास्त आहेत. त्यामुळेच गतवेळी त्यांचे चिरंजीव ऋषिकेश पराभूत झाले होते. या वेळी तसे होऊ नये म्हणून यांच्याबरोबरच सचिन खैरेही कामाला लागले असून त्यांनी खासदारांच्या विरोधकांशी वैयक्तिक पातळीवर भेटी-गाठी सुरू केल्या आहेत.
खा. खैरे यांनी पक्षात दादागिरी करून मुलाबरोबरच पुतण्यालाही उमेदवारी दिल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठत असल्याने याचा परिणाम विरोधकांच्या फायद्यात होऊ शकतो, हे सचिन व ऋषिकेश यांना जाणवल्याचे दिसून येते. त्यामुळेच या दोघा भावांनी खैरे यांच्या विरोधकांच्या भेटी-गाठी सुरू केल्या आहेत. हे दोघेही गेल्या दोन दिवसांत खैरे यांना आतून तसेच जाहीरपणे विरोध करणाऱ्यांच्या घरी जाऊन आले. यातील एकाने तर तुमचे वैर खैरे यांच्याशी आहे, त्यात आमचा काय दोष, असा सवाल खैरे विरोधकाला केला. त्या खैरे विरोधकानेही हे मान्य केले अन् तुला नक्कीच मदत करतो, असे सांगितल्याचे समजते. आश्वासन घेतल्यानंतरच ही मंडळी तेथून बाहेर पडल्याचे सांगण्यात येते. खैरे भावंडांबरोबरच पदमपुरा (गजानन बारवाल), विद्यानगर (राजू वैद्य), उल्कानगरी (सचिन खेडकर), शिवाजीनगर (राजेंद्र जंजाळ) या वाॅर्डांतील लढती रोमहर्षक होणार असल्याने विजयाची शक्यता दिसत असली तरी धोका नको म्हणून येथील उमेदवारांनी दारोदार फिरण्याबरोबरच ज्यांनी पूर्वी विरोधात काम केले किंवा उमेदवारीला विरोध केला अशांना दूर ठेवण्यात धोका आहे, हे ओळखून काम सुरू केल्याचे समजते. घरोघर फिरून प्रचार करण्याबरोबरच उमेदवारांनी या परिसरातील प्रतिष्ठितांच्या थेट घरी जाऊन ‘नमो, नमो’ करण्यावर भर दिला आहे.
दोन सत्रांत प्रचार
कडाक्याचे ऊन असल्यामुळे उमेदवारांना सध्या दोन सत्रांत प्रचार करावा लागतो. सकाळी ७ ते १ व दुपारी ५ ते १० अशी दोन सत्रे उमेदवारांनी निश्चित केली आहेत. दुपारी उमेदवारही बाहेर पडू शकत नाहीत किंवा ते बाहेर पडले तरी मतदार त्यांना भेटत नाहीत. त्यातच शनिवारी पावसाने एका सत्राच्या प्रचारावर पाणी सोडले.