आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mp Chandrakant Khaire Speaks On Municipal Commissioner

पॉझिटिव्ह व्हा, ‘समांतर’ करून द्या !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ‘पॉझिटिव्ह व्हा, आमची समांतर जलवाहिनी करून द्या,’ असे सांगत खासदार चंद्रकांत खैरे यांनी मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना जाहीर कार्यक्रमात सुनावतानाच ‘ऊठसूट फायली घेऊन आयुक्तांकडे जाऊ नका, ते काम करतीलच. नाही तर आपल्याकडे इतर मार्गही आहेत,’ असे पक्षाच्या नगरसेवकांनाही सांगून टाकले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात बाळासाहेबांच्या भव्य तैलचित्राचे अनावरण खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत भरभरून बोलताना ठाकरे यांचा पुतळा आणि समांतर जलवाहिनी या विषयांवरून खैरे यांनी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना जाहीरपणे सुनावले. या ओघात त्यांनी नगरसेवकांनीही कसे वागावे या सूचना दिल्या.

‘ते’ काम करतीलच

खासदार खैरे नगरसेवक, पदाधिकार्‍यांना म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचा जसा सर्वांवर अंकुश होता तसा तुमचा पण प्रशासनावर अंकुश असायला हवा. आपल्या कामाची दहशत असली पाहिजे. तुम्ही काहीच करणार नसाल तर अधिकारी त्यांच्या मनाप्रमाणेच काम करतील. नगरसेवकांनो, भांडत बसू नका, ऊठसूट फाइल घेऊन आयुक्तांकडे का जाता? ते काम करतीलच, मला खात्री आहे. आणि नाही केले तर आपल्याकडे इतर मार्ग आहेत ना, असे विधान करीत त्यांनी सूचक इशाराही देऊन टाकला.

पुतळा 23 जानेवारीलाच

23 जानेवारी बाळासाहेबांच्या जयंती जयंतीदिनी त्यांचा पुतळा उभारला जाईल. आयुक्तांनीही तसा शब्द दिला आहे. आयुक्तांनी हरकत प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा, अशी सूचनाही त्यांनी केली. कार्यक्रमापूर्वी खैरे यांच्या हस्ते अमरप्रीत चौकात सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन झाले.

‘समांतर’वरून टोलेबाजी

शिवसेना आणि आयुक्त यांच्यातील संघर्षाचे कारण ठरलेल्या समांतर जलवाहिनीवरूनही खैरे यांनी आयुक्तांना सुनावले. ते म्हणाले की, समांतर माझ्या एकट्यासाठी नाही तर सगळय़ा शहरासाठी आहे. वॉर्डात कामे नाही म्हणून भांडण्यापेक्षा नगरसेवकांनी ‘समांतर’मुळे आपल्या वॉर्डात दीड कोटीचे काम होणार आहे हे पाहावे व त्यासाठी प्रयत्न करावे. आणि आयुक्तांनीही आता पॉझिटिव्ह व्हावे, आमची समांतर करून द्या अशी अपेक्षा व्यत केली. महापौर कला ओझा, आमदार प्रदीप जैस्वाल, माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांचीही या वेळी भाषणे झाली. सभागृह नेते सुशील खेडकर यांनी प्रास्ताविक केले.