औरंगाबाद- खासदार चंद्रकांत खैरे यांनी महापौर कला ओझा यांना जाहीर कार्यक्रमात उशिरा येण्याबद्दल तंबी दिली आणि महापौरांनी अश्रू ढाळले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बदली झालेले आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडे जाऊन महापौरांनी त्यांच्या वॉर्डातील थांबलेल्या कामांच्या काही संचिका मंजूर करून घेतल्या, हे खैरे यांना सहन न झाल्याने विलंबाने येण्याचे निमित्त करून त्यांनी महापौरांना झापल्याचे स्पष्ट झाले.
कार्यक्रमाला महापौरांना उशीर का होतो, याचा शोध खैरै यांनी त्यांच्या यंत्रणेकडून घेतला असता खैरे यांना कल्पना न देता महापौर आयुक्तांकडे गेल्याचे समोर आले. दुसऱ्या दिवशी महापौरांनी विलंबाचे कारण पत्रकारांना सांगितले खरे, पण इतरांना का बरे अभय देण्यात आले, असा सवालही केला. कारण नेमके त्या वेळी पालिकेतील अन्य पदाधिकारीही आयुक्तांकडे फायली घेऊन हजर होते. त्यांना खैरे काहीही का म्हणाले नाहीत, असा महापौरांचा अप्रत्यक्ष सवाल होता.