आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP Chandrakant Khair,latest News In Divya Marathi

खासदार खैरेंनी केले निम्मे डॅमेज कंट्रोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- खासदार चंद्रकांत खैरे यांच्या जाचाला कंटाळून शिवसेनेचे बडे पदाधिकारी बंडाच्या तयारीत असल्याचे वृत्त ह्यदिव्य मराठी'ने प्रकाशित करताच शिवसेनेत प्रचंड खळबळ उडाली असून खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज दिवसभर बाबापुता करून बंडोबांचा थंडोबा करण्याचे प्रयत्न केले.
त्यात त्यांना थोडेफार यश आले असून सुहास दाशरथे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. दुसरीकडे राजू वैद्य, नरेंद्र त्रिवेदी यांचीही कशीबशी समजूत काढण्यात यश आले आहे.
शिवसेनेतील बडे पदाधिकारी व नगरसेवक बंड करण्याच्या पवित्र्यात असल्याचे वृत्त बुधवारी ह्यदिव्य मराठी'ने प्रकाशित केले होते. या बातमीने राजकीय वर्तुळात खास करून शिवसेनेत प्रचंड खळबळ उडाली. शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांत आज याच बातमीची चर्चा सुरू होती. शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेला औरंगाबादेत भगदाड पडण्याच्या भीतीने शिवसेनेत घबराट पसरली. जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, शहरप्रमुख राजू वैद्य, सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे, सुरेंद्र कुलकर्णी, जगदीश सिद्ध, प्रीती तोतला यांच्यासारखी माणसे ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामुळे पक्षाबाहेर जाण्याचा धक्का मोठा असणार होता. या होऊ घातलेल्या बंडाची माहिती मुंबईपर्यंत पोहोचवण्यात आली.

खैरेंनी घेतली भेट :
आज सकाळपासून स्वत: खासदार चंद्रकांत खैरे यांनी डॅमेज कंट्रोल हाती घेतले. या सर्वांशी त्यांनी संपर्क साधला. पैकी सिद्ध, कुलकर्णी, तोतला यांनी त्यांना दादच दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, नंदकुमार घोडेले यांना जिल्हाप्रमुख करण्यात आल्याने नाराज झालेले राजू वैद्य, नरेंद्र त्रिवेदी तर पूर्व मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आलेले सुहास दाशरथे यांना खासदार खैरे यांनी खास बोलावून घेतले व थेट आमने सामने चर्चा केली.
नाराजी बोलून दाखवली : शिवसेनेतील सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार या असंतुष्टांनी खैरे यांना थेट आपली नाराजी सांगून टाकली. दाशरथे यांच्याबाबत त्यांनी बैठकीत काढलेले उद्गार त्यांना आवडले नव्हते तेही त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले. जिल्हाप्रमुखपदी कोणाचीच नियुक्ती करण्यात आली नसल्याचे सांगत इतरांनाही शांत करण्याचा प्रयत्न खैरे यांनी केला व झाल्या प्रकारांबाबत नरमाईची भूमिका घेतली.
दाशरथे प्रचारात
यानंतर थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दाशरथे यांचे बोलणे झाले व त्यांनी दाशरथे यांना तुमच्या पक्षकार्याची दखल घेऊ, असे सांगत अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. याबाबत बोलताना दाशरथे यांनी उद्धव ठाकरे यांनी आपले समाधान केल्याने आपण पुन्हा पूर्व मतदारसंघात प्रचाराला लागणार असल्याचे सांगितले.