आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP Chandrakant Khair,latest News In Divya Marathi

तनवाणी-खैरेंत आरोपांच्या फैरी, 'समांतर'वरून जुंपली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत समांतर जलवाहिनीचा मुद्दा ऐरणीवर आला असून या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी नव्हे तर चक्क भाजपनेच यावरून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामुळेच 350 कोटींची समांतरची योजना 1200 कोटींपर्यंत पोहोचल्याचा आरोप भाजपचे उमेदवार किशनचंद तनवाणी केल्यानंतर खैरे संतापले. असा आरोप करणे वेडेपणाचे लक्षण असून ही योजना मी काँग्रेस सरकार असताना पाठपुरावा करून मंजूर करून आणली, असे खैरे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत समांतर जलवाहिनीचा विषय वादाचा ठरणार अशी अपेक्षा होती. तसेच आता सुरू झाले आहे. शनिवारी गरवारे स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी तनवाणी यांनी या वादाला तोंड फोडले. आपल्या भाषणात तनवाणी यांनी खासदार खैरे यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले की, मी महापौर असताना योजनेच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्या वेळीच ही योजना मंजूर झाली असती तर 350 कोटी रुपयांतच ती पूर्ण झाली असती. पण खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यात स्वार्थासाठी खोडा घातल्याने आज ही योजना 1200 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली, असा आरोप त्यांनी केला. या आरोपानंतर खासदार खैरे यांनी मौन सोडून ते म्हणाले, या योजनेबाबत त्यांना काही माहीत नाही. ही योजना मंजूर करण्यासाठी मी केलेला पाठपुरावा कारणीभूत आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना 792 कोटींची ही योजना मंजूर करण्यात आली. त्यासाठी किती यातायात करावी लागली हे त्यांना काय माहीत? माझ्यावर असे आरोप करणे हे वेडेपणाचे लक्षण आहे. सगळी पदे मिळूनही त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली. हे जनतेला मान्य होणार नाही हे त्यांना कळून चुकले आहे, म्हणून ते असे आरोप करीत आहेत.