आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख‌ासदार खैरेंना अचानक आली पुतळ्यांची आठवण, दुर्लक्ष होत असल्याचा नवा मुद्दा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद; महानगरपालिकेच्या राजकारणातील स्थानाला धक्का बसला असला तरी आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जाणार हे पक्के आहे. पालिका आयुक्तांवरील अविश्वास प्रस्तावावर खैरे यांना पक्षाने एकटे पाडले असले तरी त्यांनी हार मानलेली नाही.
थोर पुरुषांच्या शहरातील पुतळ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा नवा मुद्दा त्यांनी समोर आणला आहे. आहे त्या पुतळ्यांची देखभाल, दुरुस्ती तसेच सुशोभीकरण करण्यात यावे तसेच प्रस्ताव मंजूर झालेले पुतळे तातडीने उभारण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

खा. खैरे यांनी महापौर त्र्यंबक तुपे तसेच महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन तशी सूचना केली आहे. शहरातील पुतळ्यांचा उल्लेख त्यांनी निवेदनात केला असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

एकीकडे आयुक्तांवरील अविश्वास प्रस्ताव, त्यावरून सुरू झालेले राजकारण चर्चेत असताना खैरे यांनी हा नवा मुद्दा पुढे केला आहे. शहराच्या सौंदर्यासाठी पुतळेही तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पुतळे झाले पाहिजेत तसेच त्याभोवतीची अतिक्रमणेही काढली पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे. पालिका प्रशासनाने प्रस्ताव मंजूर करूनही प्रस्तावानुसार पुतळे बसवण्यात आलेले नाहीत.

शहर एकीकडे स्मार्ट होत असताना थोर पुरुषांच्या पुतळ्यांची गरज आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचे खैरे यांनी निवेदनात म्हटले आहे. तातडीने या पुतळ्यांची उभारणी करण्यात यावी; अन्यथा लोकप्रतिनिधी म्हणून लक्ष घालावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

महात्मा बसवेश्वर (स्वामी विवेकानंद उद्यान, एन-१२), महाराणा प्रताप (कॅनॉट प्लेस), सावित्रीबाई महात्मा फुले (औरंगपुरा), जिवा महाले (छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय, छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज (मराठवाडा मुक्ती संग्रहालय, सिद्धार्थ उद्यान) शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (अमरप्रीत चौक).