आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी प्रश्नावर केंद्र सरकारला गुडघे टेकायला लावणार- खा. राजू शेट्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देशभरातील शेतकऱ्यांचा मोर्चा नेऊन केंद्र सरकारला गुडघे टेकायला लावणार असल्याची प्रतिज्ञा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी वैजापूर येथे बुधवार केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यात ते बोलत होते. 

शेट्टी पुढे म्हणाले की, सरसकट कर्जमाफीसाठी सर्वंकष प्रयत्न सुरूच आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजपत गेलो, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साफ निराशा केली असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आमच्याशी विश्वासघात केला, म्हणून आम्ही सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मोदी फडणवीस हे आपले शत्रू नाहीत, परंतु त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी सोयरसुतक नाही. कांद्याचे दर वाढल्यावर मोदींनी पाकिस्तानातून कांदा आयात करून देशातले शेतकरी मरणी घातले. 

केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. मी सत्तेचा लोभी नाही. मला दीड एकर शेती होती आणि आजही तितकीच आहे. जे सत्तेच्या मोहात गेले त्यांचे काय होते सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणून त्यांनी अप्रत्यक्ष सदाभाऊ खोत यांनाही चिमटा काढला. वैजापूर येथील विनायक कारखाना, रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करणे, याशिवाय पुणेगाव-दरसवाडी पाटाचे काम करण्यासाठी चंद्रकांत कटारे यांच्या अध्यक्षतेखाली एकत्र या, आम्ही तुमच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

याप्रसंगी चंद्रकांत कटारे यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. या वेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, राज्य अध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी खा. शेट्टी यांची लक्ष्मी टॉकीज ते डेपो रोडपर्यंत बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. संतोष सूर्यवंशी, संतोष निकम, यादवराव कांबळे, पारसनाथ जाधव, रतन कराळे, रावसाहेब काळे, संजय सरोवर, अण्णा रोठे, शांताराम सोमासे आदी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...