आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणशास्त्र एमफिल प्रवेश २० सप्टेंबरपर्यंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाने अखेर २० सप्टेंबरपर्यंत ‘एमफिल’ला प्रवेश देण्याचे शुक्रवारी (१६ सप्टेंबर) निश्चित केले. सीईटी घेऊन जवळपास तीन महिने होऊनही थातूरमातूर कारण सांगून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले नव्हते, तर फेलोशिप मिळते म्हणून प्रवेश स्थगित ठेवल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. ‘दिव्य मराठी’ने १४ सप्टेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे प्रशासनाने चूक मान्य करत नरमाईची भूमिका घेतली. त्यानंतर बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील यांनी प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत.
संशोधन करणारे प्रत्येकी चार विद्यार्थी एका संशोधक मार्गदर्शकाकडे असावेत, असा नियम असल्याचे सांगून विभागातीलच एका विद्यार्थ्याने तक्रार देऊन ठेवली होती. सर्वच विभागांची त्यांनी तक्रार केली असली तरीही फक्त शिक्षणशास्त्र विभागाने एमफिलची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. सीईटीनंतर जुलै अखेरपर्यंत प्रवेश होणे अपेक्षित होते, पण ‘सीईटी’ होऊन तीन महिने होत आले तरीही विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवले होते. संबंधित विद्यार्थ्यांनी ‘दिव्य मराठी’ला दूरध्वनी करून आपबीती सांगितली होती. एमफिल करणाऱ्या विद्यार्थ्यांना यूजीसीची राजीव गांधी आणि मौलाना आझाद यांच्या नावाने फेलोशिप मिळते. दोन्ही फेलोशिपला अर्ज करण्याची मुदत १५ ऑगस्ट २०१६ रोजी संपली आहे. मुद्दाम फेलोशिप मिळू नये म्हणून विद्यापीठ प्रशासन आम्हाला प्रवेशापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी बीसीयूडी संचालक डॉ. पाटील यांना विभागाचा आढावा घेण्यास सांगितले होते. आता उशीर झालेला असला तरीही शक्य तितक्या लवकर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश कुलगुरूंनी दिले होते. डॉ. पाटील यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून २० सप्टेंबरपर्यंत प्रवेश देण्याचे आदेश विभागप्रमुखांना दिले. विभागप्रमुखांनी सर्व विद्यार्थ्यांना दूरध्वनी करून प्रवेशासाठी येण्यास सांगितले आहे. शिवाय मोबाइलवर एसएमएसही पाठवले आहेत. २० सप्टेंबरपर्यंत प्रवेश झाल्यानंतर त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी सर्व शिक्षक पार पाडतील, अशा सूचनाही विद्यापीठाने केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...