आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसस्थानकांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राज्य परिवहन महामंडळाच्या एक हजारांहून अधिक बसगाड्या रोज नगरमधून ये-जा करतात. येथील तारकपूर व स्वस्तिक बसस्थानकावर 24 तास प्रवाशांची येथे वर्दळ असते, पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मात्र कसलीही व्यवस्था तेथे करण्यात आलेली नाही. तारकपूर बसस्थानकावर असलेल्या मदत कक्षात पोलिसांचा पत्ता नसतो. तीन क्रमांकाच्या स्वस्तिक बसस्थानकावर पोलिस मदत केंद्रच नाही! त्यामुळे या दोन स्थानकांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे.

मागील आठवड्यात तारकपूर बसस्थानकावर एका चोरट्याने बसच्या खिडकीतून आत हात घालून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून धूम ठोकली. दोन महिन्यांपूर्वी याच बसस्थानकावर एका बसमध्ये बाँब ठेवल्याची अफवा पसरली होती. यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत. वास्तविक येथे प्रवाशांच्या मदतीसाठी पोलिस मदत केंद्र बांधण्यात आले आहे. तेथे नियुक्त केलेल्या पोलिसांनी अशा प्रकारांना आळा घालणे अपेक्षित आहे. पण, मदत केंद्रात पोलिस कर्मचारीच नसतो. ‘दिव्य मराठी’ने पाहणी केली त्या वेळी या केंद्रात एक श्वान निवांत पहुडलेला होता.

स्वस्तिक बसस्थानकाची अवस्था यापेक्षा फारशी वेगळी नाही. या बसस्थानकातून चोवीस तासांत सुमारे साडेसातशे एसटी बसगाड्या ये-जा करतात. शहरातून जाणारी लांब पल्ल्याची प्रत्येक बस या स्थानकावरून पुढे मार्गक्रमण करते. त्यामुळे दिवसभर हजारो लोकांचा राबता या बसस्थानकावर असतो. मात्र, असे असूनही या बसस्थानकावर पोलिस मदत केंद्र नाही. राज्य परिवहन कर्मचारी संघटना, तसेच एसटी प्रशासनाने या बसस्थानकावर पोलिस चौकी देण्याची मागणी केली आहे, पण अजून त्याची दखल घेण्यात आलेली नाही, अशी माहिती विभाग नियंत्रक दिलीप शिंदे यांनी दिली.

माळीवाडा स्थानकात पोलिस चौकी आहे. तेथे चोवीस तास पोलिस असतात. त्यामुळे या बसस्थानकावर पाकीटमारी व प्रवाशांचे सामान चोरीला जाण्याच्या घटना इतर स्थानकांच्या तुलनेत कमी घडतात. या चौकीतील पोलिस कर्मचारी शेजारीच दिवसातून ठरावीक वेळा स्वस्तिक स्थानकावर चक्कर मारतात, पण तारकपूर व तीन नंबर स्वस्तिक बसस्थानकावर कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी नसल्यामुळे तेथे चोरीचे प्रकार वारंवार घडतात.