आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

४३० ‘मुख्यमंत्री मित्र’ ठेवणार बाबूंवर नजर, याेजनांच्या अंमलबजावणीवर ठेवणार लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यात सत्तेवर येऊन दोन वर्षे उलटूनही राज्य सरकारच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी दिसत नसल्याने आता ‘मुख्यमंत्री मित्र अभियान’ हाती घेण्यात आले आहे. राज्याच्या सर्व जिल्ह्यांत ४३० ‘मुख्यमंत्री मित्र’ योजनांवर नजर ठेवणार असून एक प्रकारे बाबूशाहीवर त्यांची करडी नजर राहणार आहे. हे अभियान नुकतेच कार्यान्वित झाले आहे.

राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून विविध योजनांची घोषणा करण्यात आली. त्यांची राज्यात अंमलबजावणीही सुरू झाली. पण या योजनांचा परिणाम योग्य होत आहे की नाही याबाबत खरे चित्र समोर येत नसल्याने आता याबाबत मुख्यमंत्र्यांची वेगळीच टीम या कामाला लावण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री मित्र अभियान’ असे या अभियानाला नाव देण्यात आले आहे.

सर्व जिल्ह्यांत, अ-राजकीय ‘मित्र’ : या योजनेंतर्गत राज्याच्या ३६ जिल्ह्यांमधून ४३० जणांची टीम तयार करण्यात आली आहे. डाॅक्टर, प्राध्यापक, वकील यासह समाजाच्या विविध स्तरांतील भाजपसमर्थक मंडळी या टीममध्ये आहे. या टीमला नुकतेच मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत प्रशिक्षण देण्यात आले. भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, या टीममधील बहुतेक साऱ्या अ-राजकीय व्यक्ती आहेत.

कामकाजावर ठेवणार वाॅच : या साऱ्यांची नोंदणी एक वर्षासाठी ‘मुख्यमंत्री मित्र’ म्हणून करण्यात आली आहे. हे मित्र आपापल्या जिल्ह्यांत सरकारी योजनांची स्थिती काय, त्याची अंमलबजावणी योग्य होत आहे की नाही, प्रशासनातील त्रुटी काय, सर्वसामान्यांना या योजनांचा लाभ होत आहे की नाही यावर लक्ष ठेवणार आहेत.

ही व्यक्ती नव्हे, व्यवस्था
आतासमावेशक लोकशाहीऐवजी सहभागिता असलेली लोकशाही गरजेची असून त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्यवस्थेत शिरून व्यवस्था बदलावी लागेल. ‘मुख्यमंत्री मित्र’ ही त्यातूनच पुढे आलेली योजना आहे. ‘मुख्यमंत्री मित्र’ ही कुणी व्यक्ती नसून ती एक व्यवस्था असावी त्यांनी जनतेचे मित्र राहावे, मुख्यमंत्र्यांकरिता काम करता जनतेसाठी त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सीएम ठेवणार लक्ष
राज्यातील हे सारे ‘मुख्यमंत्री मित्र’ आपापले अहवाल आॅनलाइन सादर करणार आहेत. त्यासाठी एक खास पोर्टल तयार करण्यात आले असून या ‘मुख्यमंत्री मित्रांना’ स्वतंत्र लाॅग इन व पासवर्ड देण्यात आला असून त्यांनी तेथे सादर केलेली माहिती भाजपच्या मुंबईतील वाळकेश्वरमध्ये असलेल्या मुख्य वाॅररूममधील खास टीम व खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहतील.
बातम्या आणखी आहेत...