आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकुल मंदिरच्या विद्यार्थ्यांनी शोधला पाणी बचतीचा असाही फंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहर तसेच जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. वृक्ष, प्राण्यांना तर पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे मुकुल मंदिर शाळेच्या परिसरातील वृक्षांना आवश्यक तेवढे पाणी मिळावे म्हणून विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. शाळा संपल्यावर दररोज वॉटर बॉटलमध्ये उरलेले पाणी फेकून देण्याऐवजी एका ड्रममध्ये जमा करून ते वृक्ष, पक्ष्यांना दिले जात आहे. पाणी बचतीचा हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.

मराठवाड्यात सध्या भीषण पाणीटंचाई असून ग्रामीण भागात पाणी मिळणे अतिशय अवघड झाले आहे. त्यातल्या त्यात वृक्ष, पशू-पक्ष्यांना पाणी मिळत नसल्याचे चित्र दिसते. कितीही पाणीटंचाई असली तरी अनेक जण पाण्याचा अपव्यय करणे सोडत नाहीत. त्यामुळे उद्याचा जबाबदार नागरिक म्हणून मुलांना पाणी बचतीची सवय जडावी या उद्देशाने शाळेने हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत शाळा सुटल्यानंतर मुले दररोज वॉटर बॉटलमध्ये उरलेले पाणी एका ड्रममध्ये जमा करतात. नंतर तेच पाणी वृक्षांना टाकण्यात येते. वेगवेगळ्या वृक्षांना पाणी घालून झाडे वाचवण्याचे कार्य केले जात आहे. प्रत्येक आळ्यात एक छोटे मातीचे कवळ ठेवण्यात आले आहे. त्यात पक्ष्यांसाठी दाणापाणी ठेवण्यात आले आहे.

मुलांमध्ये उत्साह
आपण रुजवलेली सामाजिक मूल्ये मुले देखील पाळतात. त्यांना योग्य वेळी योग्य गोष्ट समजावण्याची गरज आहे. याची जाणीव आपल्यापेक्षाही अधिक मुलांमध्ये असल्याचे या प्रयोगावरून लक्षात आले. आज प्रत्येक विद्यार्थी पाणी साठवण्यात आपले योगदान देत आहे. आपल्या घरीदेखील असा प्रयोग विद्यार्थी राबवत आहेत. - सुरेश परदेशी, मुख्याध्यापक