औरंगाबाद- खिडकीतून हात घालून चोरट्यांनी सोमवारी (7 जुलै) पहाटे तीन वाजता सोने लांबवले. जिजामातानगर (जयभवानीनगर) येथे ही घटना घडली असून चोरट्यांनी 48 हजार किमतीचे सोने चोरले आहे. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री पाऊस सुरू झाल्याने महादेव गोपीनाथ आव्हाड (40, रा. जयभवानीनगर) यांच्यासह अनेकांच्या घरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. घरात गारवा येण्यासाठी बेडरूमची खिडकी त्यांनी सुरू ठेवली. शिवाय झोपण्यापूर्वी पत्नी आणि त्यांनी स्वत: सोन्याचे दागिने काढून पलंगावरच ठेवले होते.
रात्री तीनच्या सुमारास घरफोडीसाठी निघालेल्या दोन भामट्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांना पलंगावर ठेवलेले सोन्याचे दागिने निदर्शनास आले. त्यांनी हात घालून महिलेचे 11 ग्रॅमचे गंठण आणि एक सोनसाखळी असा 48 हजार रुपये किमतीचा ऐवज लांबवला. दरम्यान, चोरट्यांचा हात खिडकीच्या पटाला लागल्यामुळे महादेव यांना जाग आली. खिडकीतून चोरट्यांचा हात पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र दोघेही भामटे पसार झाले. बाहेरून दरवाजा लावलेला असल्यामुळे त्यांना पाठलागही करता आला नाही. आरडाओरडा केल्यानंतर रात्री गस्तीवरील पोलिसांनी महादेव यांचा दरवाजा उघडला.
त्यावेळी त्यांनी घडला प्रकार पोलिसांना सांगितला. सकाळी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चोरीचा (भादंवि 380) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांच्या मार्गदर्शनात जमादार सुभाष भोसले पुढील तपास करत आहेत.