आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाचा विकास कालमर्यादेत करा’, प्रशासनाकडून वेळेत कामे करण्याची ग्वाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वेस्थानक स्थापन होऊन १६ वर्षे पूर्ण होत आहेत, परंतु अद्यापही विकास झालेला नाही. या रेल्वेस्थानकावरून दररोज ३५ हजार प्रवासी ये- जा करतात. सुविधा नसल्याने प्रवाशांची हेळसांड होत आहे. स्थानकावर तिकीट आरक्षणाची व्यवस्था नाही, एक्स्प्रेस रेल्वे थांबत नाही. याबरोबर स्थानकापर्यंत जाण्यासाठी रस्ते चांगले नाही तसेच शहर बसची व्यवस्था नाही.
 
डी दर्जानुसार सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देऊन समस्या तातडीने सोडवाव्यात या मागणीसाठी मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी बुधवारी जानेवारी रोजी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले. त्यात शेकडो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कालमर्यादेत विकासकामे करण्याची मागणी करण्यात आली. 
 
वर्मा यांनी रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, जनशताब्दी एक्स्प्रेस आणि नांदेड-मुंबई-तपोवन एक्स्प्रेस रेल्वे ट्रायल बेसिसवर १० एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत चालू कराव्यात, रेल्वेस्थानकावर रेल्वे क्रॉसिंगसाठी लूपलाइन टाकावी.
 
३१ मार्चपासून तिकीट आरक्षण प्रणाली सुरू करावी, जेणे करून मुख्य रेल्वेस्थानकावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. डी दर्जानुसार विकास साध्य करण्यासाठी जी विकासकामे केली जात आहेत ती निकृष्ट दर्जाची होत आहेत. या कामाची तपासणी करावी. पीटलाइनमुळे नवीन रेल्वे देत नाही. 
 
उन्हाळ्याच्या सुट्या लक्षात घेऊन ३१ जुलैपर्यंत नांदेड-औरंगाबाद-मनमाड-वसईमार्गे जोधपूर-बिकानेर-औरंगाबाद- दिल्ली-कटारा-जम्मुतावी हॉलिडे विशेष रेल्वे सुरू करण्यात याव्यात. तसेच नांदेड -संत्रागछी धावणाऱ्या रेल्वेचा विस्तार औरंगाबादपर्यंत करावा. दक्षिण मध्य रेल्वेला मनमाडमार्गे रेल्वे चालू करण्यास अडचण असेल तर पूर्णा-अकोलामार्गे रेल्वे सुरू करावी.
 
 यासाठी जानेवारीला होणाऱ्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत ठोस निर्णय घेऊन रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करावा. प्रवाशांच्या सेवेसाठी सर्व मागण्या कालमर्यादेतच पूर्ण कराव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे वर्मा यांनी सांगितले. या आंदोलनाला अॅड. प्रदीप देशमुख, भरत राठोड, झुंजार छावाचे संस्थापक अध्यक्ष नीलेश डव्हळे पाटील, संजय शिंदे, व्ही. संतोष, संजय एम. पुंजाराम के. यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. 
 
मुकुंदवाडी रेल्वेस्थानकात एकदिवसीय धरणे आंदोलनाची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली असून स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्मा नागरिकांना वेळेत कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली. तसेच एक्स्प्रेस रेल्वे प्रायोजिक तत्त्वावर थांबवण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. 
बातम्या आणखी आहेत...