आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-अजिंठा हेलिकॉप्टर सेवेचा निर्णय २७ रोजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी जास्तीत जास्त विदेशी पर्यटक औरंगाबादेत यावेत यासाठी डिसेंबरमध्ये मुंबई-अजिंठा हेलिकॉप्टर सेवा सुरू होईल. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या सहकार्याने गिरीसन एअरवेजमार्फत ही सेवा सुरू होईल. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्याकडे २७ नोव्हेंबर रोजी बैठक होत असून डिसेंबरपर्यंत हेलिकॉप्टर सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

चिकलठाणा विमानतळावरून अजिंठा लेणी ११० कि. मी.वर अाहे. मुंबईहून येणाऱ्या विदेशी पर्यटकांना एकाच दिवशी अजिंठा लेणी पाहणे शक्य होत नाही. रेल्वेने सहाशे कि.मी. प्रवास करून लेणी बघण्यासाठी औरंगाबादेत दोन-तीन दिवसांचा मुक्काम होतो. विदेशी पर्यटक इच्छा असूनही अजिंठा ऐवजी इतरत्र जातात.

जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्याकडे २७ नोव्हेंबर रोजी एमटीडीसीचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक पांडुरंग कुलकर्णी आणि गिरीसनचे विवेक जैन यांच्यात अंतिम बैठक होणार आहे. अजिंठ्यानंतर पुढील सहा महिन्यांत वेरूळ लेणीसाठीही अशीच सेवा दिली जाणार असल्याचे जैन यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले आहे.

पर्यटन वाढवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
विदेशी पर्यटकांची संख्या आणि महसूल वाढावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे. स्थानिक पातळीवर लँडिंगसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेची त्याचबरोबर नागरी उड्डयन विभागाच्या महासंचालकांची परवानगी घेण्याचे काम होणार आहे. त्यामुळे दोन्ही तांत्रिक अडचणी सुटल्यास सामंजस्य करार होऊन लगेच सेवा सुरू होईल.
पांडुरंग कुलकर्णी, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी

हेलिपॅड तयार
पर्यटकांची गैरसोय टळावी म्हणून एमटीडीसीने यापूर्वीच अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या अभ्यागत केंद्राजवळ हेलिपॅड तयार केले आहे. गिरीसन एअरवेजच्या माध्यमातून हेलिकॉप्टर सेवा देण्याचा एमटीडीसीचा विचार आहे. गिरीसन एअरवेज आणि एमटीडीसीमध्ये नोव्हेंबर अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सामंजस्य करार केला जाणार आहे.