आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या मदतीविना झाली एवढी मोठी सभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुंबईत नरेंद्र मोदींच्या झालेल्या सभेनंतर भाजपच्या औरंगाबादमधील कार्यकर्त्यांना पाठबळ मिळाले आहे. मुंबईत पहिल्यांदाच सभेला जाणारे कार्यकर्ते तर शिवसेनेशिवाय इतकी मोठी सभा मुंबईत झाल्यामुळे भारावून गेले आहेत. एवढी गर्दी पहिल्यांदाच पाहिल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये असून या सभेमुळे प्रेरणा मिळणार असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

भाजपच्या मुंबईतील मांदीच्या सभेसाठी औरंगाबादमधून मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते रेल्वे तसेच गाड्या करूनदेखील गेले होते. मोदींच्या सभेतली गर्दी पाहून भाजपचे कार्यकर्ते चांगलेच भारावून गेले आहेत. यामध्ये प्रत्येकाला मोदींचे भाषण तर आवडलेच, तर काहींना राजनाथसिंह आणि काहींना गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे भाषण आवडले. भाजपच्या वतीने या सभेचं नियोजन उत्तम केल्याचे सांगायलादेखील कार्यकर्ते विसरले नाहीत, तर काहींनी गेटजवळूनच भाषण ऐकल्याची माहिती सांगितली. सभेच्या ठिकाणी आणि बाहेरही मोठी गर्दी असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

गेल्या सात वर्षांपासून भाजपचे काम करत आहे. मात्र, इतकी मोठी सभा कोणाची झाल्याचे टीव्हीवरदेखील पाहिले नाही. पहिल्यांदात मुंबईत सभेला गेलो होतो. आजूबाजूला सगळीकडे गर्दीच गर्दी दिसत होती. या सभेमुळे आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेशिवाय सभा इतकी मोठी झाल्यामुळे आणखी उत्साह निर्माण झाला आहे. मंगलमूर्ती शास्त्री, सरचिटणीस, गारखेडा मंडळ भाजप

आम्ही सात कार्यकर्त्यांसोबत गाडी घेऊन गेलो होतो. मोदींची सभा पहिल्यांदाच ऐकली. मोदींची ही सभा आम्हाला काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. सभेतील गर्दीनेच आम्हाला विश्वास दिला आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तनाची ही चिन्हे आहेत. बळीराम कदम, अध्यक्ष, मुकंदवाडी मंडळ भाजप

जनसागर पाहूनच भारावून गेलो होतो
मुंबईची मोदींची सभा भाजप सत्तेत येणार हे सांगणारी आहे. या सभेत गेल्यानंतरचा जनसागर पाहूनच भारावून गेलो होतो. सुरुवातीला जागा मिळाली नसल्यामुळे गेटवरूनच पूर्ण सभा ऐकली. भाजप नेत्यांच्या भाषणात आत्मविश्वास पाहायला मिळत होता. आम्हा युवा कार्यकर्त्यांनादेखील आता काम करताना सत्ता येणार असा विश्वास मिळाला आहे. -राहुल चौधरी, कार्यकर्ते, भाजप

ही सभा पाहून प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. राजकीय सभेसाठी पहिल्यांदाच मुंबईत गेलो होतो. मोदींच्या सभेमुळे भाजपला महाराष्ट्रात फायदा होईल. तसेच कार्यकर्त्यांनादेखील जिंकण्याची नवी आशा या सभेतून मिळाली आहे. या सभेसाठी मराठवाड्यातून सर्वाधिक लोक आले होते. त्यामुळे सभेतून प्रेरणा घेऊन कार्यकर्ते मराठवाड्यात चित्र बदलवतील. मनदीप राजपूत, कार्यकर्ते भाजप

नरेंद्र मोदींच्या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्हा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून निवडणुकीच्या आधी पक्षासाठी माणसे जोडताना त्याचा फायदा होईल. ही सभा इतकी प्रचंड मोठी होती की, जिकडे पाहावे तिकडे गर्दीच गर्दीचे चित्र सभेत पाहायला मिळाले. त्यामुळे सभेला गेल्याचे फलित मिळाले आहे. रामेश्वर भादवे, कार्यकर्ते भाजप