औरंगाबाद - मुंबईहून नांदेडकडे निघालेल्या तपोवन एक्स्प्रेसमध्ये दोन वेळा तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रकार प्रवाशांनी निदर्शनास आणून दिल्याने मोठा अपघात टळला.
चालकाने गाडी थांबून एका बोगीची पाहणी केल्यानंतर एक पाइप तुटून त्यातून वेगाने हवा बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास तपोवन एक्स्प्रेसने मनमाड स्टेशन सोडल्यानंतर प्रवाशांनी गाडी रोखली. पाहणीनंतर पाइपचा जोड तुटल्याचे निदर्शनास आले. चालकाने पाइप जोडला व गाडी सुरू केली. गाडी कशीबशी दौलताबाद परिसरात येताच पुन्हा तो पाइप तुटला. प्रवाशांनी पुन्हा चेन खेचून गाडी थांबवली. पुन्हा पाइप जोडण्यात आला. त्यानंतर रेल्वे औरंगाबादेत आली.