आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या नीलांबरीसारखी बससेवा औरंगाबादेत का नाही?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पर्यटनाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या औरंगाबाद शहराला दररोज किमान पाच हजार देशी विदेशी पर्यटक भेट देतात. पण शहरातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. मुंबईमध्ये एमटीडीसीकडून नीलांबरी मुंबई दर्शन स्वतंत्र बससेवा सुरू आहे. या धर्तीवर औरंगाबाद शहरात बससेवा का नाही, असा प्रo्न अनेक पर्यटक उपस्थित करत आहेत.

शहरात आलेल्या देशी-विदेशी पर्यटकांना ट्रॅव्हल एजंट आणि रिक्षाचालकांशी वादावादी करावी लागते. अनेक पर्यटकांशी हे लोक हुज्जत घालत असल्यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे. शहर बससेवा सुरू केल्यास या प्रकारांना आळा बसेल असे काही पर्यटन तज्ज्ञांचे मत आहे.

सध्या काय आहे परिस्थिती : औरंगाबादला रेल्वे, बस आणि विमानाद्वारे रोज पर्यटक येतात. त्यांना शहरातील पर्यटनस्थळे बघायचे असल्यास रिक्षा, प्रायव्हेट टॅक्सीचा आधार घ्यावा लागतो. यासाठी कुठलेही दर निश्चित करण्यात आलेले नाहीत. सगळेच पर्यटक एमटीडीसी कार्यालयाशी संपर्क साधत नसल्यामुळे त्यांना शहराची सविस्तर माहिती मिळत नाही. एमटीडीसी कार्यालयाशी संपर्क साधल्यास ते पर्यटकांसाठी योग्य सहलीचे नियोजन करून देण्यास मदत करतात. पण त्यांची स्वतंत्र वाहन व्यवस्था नाही.

2006 मध्ये झाले प्रयत्न : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त असीमकुमार गुप्ता, तत्कालीन महापौर विजया रहाटकर आणि एमडीसीचे अधिकारी यांनी हा उपक्रम सुरू करण्यासाठी 2006 मध्ये प्रयत्न केले होते. पण या प्रयत्नांना मूूर्त रूप आले नाही.

हिप इन आणि हॉप आऊट सुविधाही एक पर्याय : दिल्लीसह परदेशात पर्यटकांसाठी हिप इन हॉप आऊट सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधे अंतर्गत शहरातील पर्यटनस्थळासाठी काही विशेष बससेवा सुरू करता येतात. त्यासाठी एकाच सेंटरवर एकदाच तिकीट घ्यावे लागते. त्यानंतर हव्या तेवढय़ा वेळ पर्यटक या पर्यटनस्थळी थांबू शकतात.

संपूर्ण सहकार्य असेल : पर्यटकांच्या सोईसाठी बससेवा आवश्यक आहे. या उपक्रमासाठी एमटीडीसीकडून संपूर्ण सहकार्य राहील. एसटी महामंडळाने आणि मनपानेही प्रयत्न करणे आवश्यक आहे. एखाद्या खासगी ट्रॅव्हल कंपनीने पुढाकार घेतल्यास त्याचाही विचार करू.

0 चंद्रशेखर जैस्वाल, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी

सकारात्म विचार करण्यात येईल : एमटीडीसीकडून प्रस्ताव आल्यास सकारात्मक विचार करण्यात येईल. पर्यटकांची सुविधा लक्षात घेऊन धोरणात्मक निर्णय घेता येऊ शकतो.

0संजय सुपेकर, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ

योग्य नियोजन हवे : शहरातील या उपक्रमांशी संलग्न असलेल्या विभागाने योग्य नियोजन केल्यास हा उपक्रम यशस्वी होऊ शकतो. 2007 मध्ये या संदर्भात नियोजनही करण्यात आले होते. पर्यटकांची वाढती संख््या लक्षात घेऊन अशा प्रकारे औरंगाबाद दर्शन करणारी बस एक चांगला पर्याय होऊ शकतो.

0 ज्ञानदा कुलकर्णी, निवृत्त सांस्कृतिक अधिकारी मनपा

असा असेल मार्ग..

एमटीडीसीचे रेल्वेस्टेशनजवळील कार्यालय, मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानक येथे बस थांबे असावेत. पानचक्की, औरंगाबाद लेणी, बीबीका मकबरा, छत्रपती शिवाजी पुराणवस्तू संग्रहालय, दिल्ली गेट, हिमायत बाग, सलीम अली सरोवर, किलेअर्क, जुने औरंगाबाद, कलाग्राम आणि मॉल्स.

अशी हवी बस

बस सुशोभित आणि डबल डेकर असावी. बसचा वरचा मजला उघडा असल्यास पर्यटकांना शहराचे अवलोकन करता येईल. बसमधून 15 किलोमीटरच्या अंतरातील पर्यटन स्थळे दाखवण्यात यावेत. शहराची संपूर्ण माहिती देणारा गाईड नेमावा.

बससेवेचे असे होतील फायदे

पर्यटनाच्या हंगामात शहराला रोज किमान पाच हजार पर्यटक भेट देतात. वर्षभरात हा आकडा 50 लाखांच्यावर जातो. शहराची संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा यांची ओळख होईल.