आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Secunderabad Devagiri Express,latest News In Divya Marathi

दीड वर्षापासून लेट धावणार्‍या पॅसेंजर गाडीच्या निषेधार्थ ठिय्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दीड वर्षापासून सतत उशिराने धावणार्‍या निझामाबाद-पुणे पॅसेंजरमुळे औरंगाबादहून मनमाडकडे प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या संयमाचा बांध अखेर मंगळवारी (18 मार्च) फुटला. त्यांनी औरंगाबाद रेल्वेस्थानकावर नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेसमोर सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन केले.
लासूर व रोटेगावकडे परीक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांनी पुणे पॅसेंजर लेट असल्याने नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेसला लासूर व रोटेगावला थांबा देण्याची जोरदार मागणी केली. सुमारे दीड हजार प्रवाशांचे हित लक्षात घेता रेल्वेने या स्थानकावर प्रत्येकी एक मिनिट गाडीला थांबवण्याची परवानगी दिल्याने पुढील अनर्थ टळला. औरंगाबाद स्थानकाहून लासूर, रोटेगाव व नगरसोलकडे दररोज सकाळी दीड हजारापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. चाकरमान्यांसह विद्यार्थी व इतर प्रवाशांसाठी पुणे पॅसेंजर व जालना-नगरसोल डेमू शटल या सोयीच्या गाड्या आहेत. पण नेमक्या याच गाड्यांना विलंब झाल्याने मंगळवारी सकाळी प्रवाशांचा संयम सुटला.
निझामाबाद-पुणे पॅसेंजर मागील दीड वर्षापासून उशिरा धावत आहे. या गाडीऐवजी प्रवासी डेमूने प्रवास करतात. औरंगाबाद स्थानकावर सकाळी 7 वाजता येणारी डेमू उशिराने धावत होती. पुणे पॅसेंजर सकाळी 8.15 वाजता येते. पण तीसुद्धा चार तासांपेक्षा जास्त उशिराने धावत असल्याचे प्रवाशांना कळले. लासूर, रोटेगावकडे जाण्यासाठी नरसापूर-नगरसोल ही एकमेव गाडी होती. या गाडीमुळेच परीक्षार्थींना परीक्षा देणे व चाकरमान्यांना कार्यालयांमध्ये वेळेवर पोहोचणे शक्य होते. परंतु या रेल्वेगाडीला लासूर व रोटेगाव स्थानकावर थांबा नाही. मंगळवारी ठिय्या दिल्यामुळे एक दिवसासाठी रोटेगाव, लासूरला ही गाडी थांबवण्यात आली.
नरसापूर-नगरसोलही लेट :
नरसापूर-नगरसोल (7231) गाडी सकाळी 6.25 वाजता औरंगाबाद स्थानकावर पोहोचते. परंतु मंगळवारी (18 मार्च) ही गाडी सकाळी 9 वाजता स्थानकावर आली. प्रवाशांनी या गाडीस लासूर व रोटेगावला थांबा देण्याची मागणी विशेष स्टेशन व्यवस्थापक अशोक निकम व वाहतूक निरीक्षक एल. के. जाखडे यांच्याकडे केली. रेल्वेच्या दोन्ही अधिकार्‍यांनी तत्काळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय नांदेडशी संपर्क साधून नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेसला एका दिवसासाठी लासूर व रोटेगावला थांबा देण्याची शिफारस केली. नांदेड विभागाने यास मान्यता दिल्यानंतर प्रवाशांचा राग शमला. ही गाडी सकाळी 9.30 वाजता नगरसोलकडे रवाना झाली.