आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ अडीच हजार रुपयांत करा मुंबईची विमानवारी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एअर इंडियाच्या बहुतांश ‘डायरेक्ट’ तसेच ‘कनेक्टिंग’ फ्लाइटच्या प्रवास शुल्कामध्ये 25 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद-मुंबई विमानाचे शुल्क प्रवासाच्या दिवशी 3,487 रुपये (प्रत्येकी), एक महिना आधी 2,878 रुपये, तर दोन महिन्यांआधीचे शुल्क 2,385 रुपये असेल. हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता, तिरुपती आदी ठिकाणचे प्रवास शुल्कही सुमारे तीन ते साडेसहा हजारांपर्यंत आले आहे. ‘अँडव्हान्स परचेस फेअर’अंतर्गत कंपनीने ही सवलत उपलब्ध केली आहे.

मंदीचा काळ असल्यामुळे कंपनीने ही विशेष योजना सुरू केल्याचे स्टेशन मॅनेजर वसंत बर्डे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. औरंगाबाद ते मुंबई आणि मुंबई ते हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता अशा ठिकाणी या सवलत योजनेचा लाभ मिळेल. ‘औरंगाबाद-दिल्ली’चे प्रवास शुल्क कमी झालेले नसले तरी ‘औरंगाबाद-मुंबई’चे प्रवास शुल्क दीड ते अडीच हजारांनी कमी झाले आहे. सुमारे दोन ते तीन आठवड्यांपूर्वी पाच ते सहा हजारांच्या घरात असलेले हे शुल्क प्रवासाच्या दिवशी (करंट फेअर) 3,487 रुपये इतके झाले आहे. मात्र, ‘औरंगाबाद-दिल्ली’च्या शुल्कात फारसा फरक झालेला नाही. या विमानाचे ‘करंट फेअर’ हे किमान 7,090 रुपये आहे. एक महिन्यापूर्वी तिकीट काढल्यास 3,638 रुपये, तर दोन महिन्यांपूर्वी तिकीट काढल्यास 3,166 रुपयांत दिल्लीला जाणे शक्य आहे, अशी माहिती कंपनीच्या शहर कार्यालयातील आरक्षण विभागातील अधिकारी मीनाक्षी भाजीपाले यांनी दिली. तसेच अलीकडेच दिल्लीहून धर्मशाला, तर लखनऊहून डेहराडूनला विमानसेवा सुरू झाल्याचे भाजीपाले यांनी सांगितले.