आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडेंच्या उपोषणाकडे स्वकीयांची पाठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे यांनी विभागीय आयुक्तालयासमोर सोमवारपासून सुरू केलेल्या उपोषणाकडे पक्षातील नेत्यांनीच पाठ फिरवल्याचे दिसून आले. सर्व नेते संपर्कातही होते मात्र, या आंदोलनापेक्षाही दुष्काळग्रस्तांची अश्लील भाषेत थट्टा करणारे अजित पवार यांचा राजीनामा महत्त्वाचा असल्याने नेते मुंबईतच होते, असा दावा प्रदेश सरचिटणीस अतुल सावे यांनी केला. मुंडे यांचे उपोषण दुसर्‍या दिवशीही चालणार हे समजताच आमदार कन्या पंकजा पालवे सकाळीच उपोषणस्थळी दाखल झाल्या.

प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगुंटीवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासह अन्य कोणीही मुंडेंच्या आंदोलनाकडे फिरकले नाही. दुसर्‍या दिवशी उपोषण सुरू राहणार हे स्पष्ट झाल्यानंतर ही मंडळी सकाळी एकदा येऊन जातील, असे अपेक्षित होते; परंतु कोणीही आले नाही. उपोषण सोडण्यासाठी मुंबईहून आलेले वन व पुनर्वसन मदत कार्यमंत्री पतंगराव कदम यांच्यासमवेत माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर तेवढे आले. अन्य नेत्यांनी मात्र सपशेल पाठ फिरवल्याची चर्चा उपोषणस्थळी होती.

पोलिसांच्या दादागिरीने भंगली शांतता

मुंडे यांचे उपोषण शांततेत सुरू होते. आज त्याची सांगता होणार असल्याने अनेकांनी येथे भेट दिली. त्यातच उपोषण सोडण्यासाठी मंत्री येणार असल्याचे समजल्यानंतर सहायक आयुक्त नरेश मेघराजानी यांची दादागिरी सुरू झाली. दुचाकी बाजूला हटवण्याचे सांगण्याऐवजी त्यांनी दुचाकी उचलून नेणारी पोलिसांची मोटार बोलावली. एक दुचाकी उचलताच मंडपातील सर्व कार्यकर्ते पोलिसांच्या विरोधात जमा झाले आणि जागेवरच रास्ता रोको सुरू झाला. प्रकरण अंगलट येत असल्याचे दिसताच मेघराजानी तेथून पसार झाले. उपस्थित नेत्यांनी आणि अन्य पोलिसांनी जमावाला शांत केले. दुचाकी मोटारीतून काढून घेतल्या. त्यानंतरच रस्ता मोकळा झाला. वेळीच जमावाला शांत केल्याने अनर्थ टळला अन्यथा काहींनी दगडफेकीची भाषा सुरू केली होती. शांतता कायम ठेवण्यासाठी नियुक्त पोलिस अधिकार्‍याच्या हेकेखोरीमुळेच येथील शांतता भंगली.