आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: मूग, उडीद, सोयाबीनला फटका; उत्पादनात 70% पर्यंत घट येणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- यंदा मान्सूनच्या पावसाने दगा दिला आहे. विशेषत: २९ तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी तर उर्वरित तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यामुळे मूग, उडीद, सोयाबीन पिकाला माेठा फटका बसला असून उत्पादनात ७० टक्के घट येणार अाहे. येथून पुढे चांगला पाऊस पडला तरीही तूर व कपाशीच्या उत्पादनात सरासरी २० टक्क्यांपर्यंत घट निश्चित येणार असल्याचे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले.  
 
यंदा चांगले पाऊसमान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकऱ्यांनी सरासरी ४९ लाख १० हजार ९१४ हेक्टरपैकी ४७ लाख १६ हजार  २०७ हेक्टरवर पेरणी  केली. मात्र, जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत  दोन ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त पावसाचे मोठे खंड पडले आहेत. काही दिवसांतील पाऊस काही तासांत पडला. म्हणजेच पावसाने आकड्यांची ५५ टक्के सरासरी गाठली. मात्र, शेती, जलपुनर्भरण, जलसंचयासाठी त्याचा फारसा उपयोग झाला नाही. 

पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरिपाची पहिली व दुबार पेरणीही वाया गेली आहे. ८० टक्के कोरडवाहू क्षेत्र असल्याने ३० टक्के क्षेत्रावरील पिके जळून गेली. तर  तग धरून असलेली ५० टक्के क्षेत्रावरील पिके माना टाकू लागली आहेत. मराठवाड्यात एकूण ४५ टक्के पर्जन्यमान कमी झाले आहे. २६ तालुक्यांत तर ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे.  कोरडवाहू क्षेत्रावरील कोवळी जळाली तर हलक्या मध्यम आणि भारी जमिनीतील पिकांची वाढ खुंटली आहे. चारा व पाण्याचे संकट सर्वत्र कायम आहे. 
 
मराठवाड्यातील पेरणीचा आलेख  
- ४९ लाख १० हजार ९१४ हेक्टर एकूण क्षेत्र
- ४७ लाख १६ हजार २०७ हेक्टर प्रत्यक्ष पेरणी
- १५ लाख ६४ हजार ९४ हेक्टर कापूस 
- १६ लाख ७२ हजार ८६ हेक्टर सोयाबीन
- मूग ११५, उडीद १०८, ज्वारी ३६, बाजरी ५७, मका १०९, तूर ९४ टक्के, भुईमूग ७८, तीळ २९, कारळ ३१, सूर्यफूल १३ टक्के, ऊस केवळ १.९ टक्के.

उत्पन्नात येणार 70 टक्क्यांपर्यंत घट   
पावसाचा १५ दिवसांचा खंड पडला तरी कमी कालावधीची पिके उद्ध्वस्त होतात. त्यामुळे मूग, उडीद उत्पादनात ७० टक्क्यांवर आणि सोयाबीनमध्ये ५० टक्के घट होणार आहे. चांगला पाऊस पडला तर कपाशी, तूर  तग धरतील. तरीही उत्पन्न घटेल.
- डॉ. अशोक ढवण, कृषी शास्त्रज्ञ. 

वास्तवतेसाठी सर्वेक्षण   
पैठण, गंगापूरसह २९ तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे.   पीक नुकसानीचे वास्तव सर्वेक्षण केले जाईल.  
- सा. को. दिवेकर, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...