आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे १० वीचे व्हॅकेशन क्लास सुरू, ६५९ विद्यार्थ्यांकडून गणित, विज्ञान इंग्रजीची तयारी करून घेणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिकेने यंदा आपल्या शाळांतील दहावीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे व्हॅकेशन क्लासेस सुरू केले अाहेत. या विद्यार्थ्यांचा इंग्रजी, गणित विज्ञान या विषयांचा अभ्यासक्रम जूनच्या आधी पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर नियमित वर्गांतही त्यांना खास शिक्षण दिले जाणार आहे.
महापालिकेच्या शाळांतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी गेल्या दोन वर्षांत चांगली कामगिरी केली असून ८५ टक्क्यांच्या वर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. असे असताना पायाभूत शैक्षणिक सुविधेअभावी या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मनपाच्या काही शाळांना भेटी देत विज्ञान, गणित इंग्रजी या तीन विषयांवर अधिक जोर देण्याचे आवाहन शिक्षक मुख्याध्यापकांना केले होते. त्यानंतर मनपा शाळातील यंदा दहावीला गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्याच्या सुट्यांत खास व्हॅकेशन क्लासेस सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मनपाच्या १२ शाळांतील सुमारे ६५९ विद्यार्थ्यांना या उन्हाळी वर्गात दहावीचा अभ्यासक्रम शिकवला जात आहे.

शिक्षण विभागाचा कार्यभार पाहणारे उपायुक्त रवींद्र निकम म्हणाले की, विद्यार्थ्यांना अवघड जाणाऱ्या गणित, विज्ञान इंग्रजी या तीन विषयांवर विशेष भर दिला जात आहे. प्रत्येक विषयाचे दोन दोन तास घेऊन जूनपर्यंत अभ्यासक्रम संपवला जाणार आहे. या विद्यार्थ्यांचा किमान तीन वेळा अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल. त्यासाठी नियमित शैैक्षणिक वर्षात जादा वर्गही घेतले जाणार आहेत. त्यातून त्यांची परीक्षेची भरभक्कम तयारी करून घेतली जाणार आहे. या विशेष मोहिमेसाठी ४६ शिक्षक ओव्हरटाइम करून वेळ देणार आहेत.

या शाळांत सुरू आहेत वर्ग
बेगमपुरा,मिटमिटा, किराडपुरा (उर्दू), शहाबाजार, सिडको एन-७, नारेगाव, मुकुंदवाडी, प्रियदर्शिनी इंदिरानगर, बन्सीलालनगर, बनेवाडी, इंदिरानगर बायजीपुरा, हर्सूल.