आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Administration, Latest News In Divya Marathi

दूषित पाणीपुरवठा नसतानाही मनपाने तोडले नळ कनेक्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वॉर्ड क्रमांक 19 शिवनेरी कॉलनी, म्हाडा कॉलनी परिसरातील रायगडनगरातील काही भागांना दूषित पाणीपुरवठा होत होता. पाणीपुरवठा विभागाने दूषित पाणीपुरवठ्याची शोध मोहीम सुरू करत वीस घरांचे नळ कनेक्शन तोडले.वीस दिवस उलटले, तरीही पालिकेच्या कर्मचा-यांना कुठून दूषित पाणीपुरवठा होतो, हे समजले नसल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी दुस-यांच्या गल्लीमधून आणावे लागत आहे. मनपा या भागात एकच वेळ पाण्याचे टँकर पुरवत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नळाला चांगला पाणीपुरवठा होत असतानाही नळ कनेक्शन तोडले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रायगड भागातील सप्तशृंगी देवी मंदिराच्या जवळ असलेल्या वीस घरांपर्यंत मनपा अधिका-यांनी शोधमोहीम थांबवली. 10 जुलै रोजी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी घरासमोर खड्डे खोदून व नळ कनेक्शन तोडले, परंतु शोधमोहिमेत पालिकेच्या कर्मचा-यांना दूषित पाणीपुरवठ्याची जागा सापडली नाही. गत वीस दिवसांपासून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दुस-या गल्लीत पायपीट करावी लागत आहे. नागरिकांनी जलवाहिनीवर बांधकाम केल्यामुळे काम करता येत नाही. मात्र, तत्काळ नागरिकांची पाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी उज्ज्वल पावले, कृष्णा देवकर, निखिल सोनजे, सुरेश रौंदळ, रवींद्र सोनवणे, अरुण लढे आदींनी केली.

नागरिकांनी जलवाहिनीवर बांधकाम केले आहे. लाइन खोदण्यात आम्हाला अडचणी येत आहेत. नागरिकांकडून सहकार्य मिळत नाही. बांधकाम तोडून कारवाई होऊ शकते. येत्या दोन-तीन दिवसांत काम पूर्ण करून सुरळीत पाणीपुरवठा करू. अशोक पद्मे, उपअभियंता

मनपाने वीस घरांचे पाणी बंद केले आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्यास आम्हालाही समजले असते. मात्र, आम्हाला स्वच्छ पाणी येत असतानाही कनेक्शन तोडले.
रवींद्र सोनवणे, रहिवासी
आमचे नळ कनेक्शन तोडले; पण मनपाने आम्हाला एक वेळ टँकर दिले. आम्हाला पिण्याचे पाणी दुस-या गल्लीतून आणावे लागत आहे. उज्ज्वल पावले, रहिवासी