औरंगाबाद- पावसाळा सुरू होताच धोकादायक इमारतींचे काय, असा प्रश्न सामान्यांप्रमाणेच पालिका प्रशासनालाही पडतो आणि एक नोटीस बजावून ते मोकळे होतात. दुर्घटना घडली, तर आम्ही नोटीस बजावली होती, असा त्यांचा युक्तिवाद असतो. यंदाही पालिकेने शहरातील 33 मालकांना आपली इमारत धोकादायक आहे ती काढून घ्यावी, अशी नोटीस बजावली. शहरातील 69 इमारती धोकादायक असल्याची नोंद असून त्यातील अतिधोकादायक 6 इमारतींना सील ठोकून त्या निर्मनुष्य करण्यात आल्या आहेत.गतवर्षी धोकादायक इमारतींची संख्या अवघी 17 होती. मात्र, गेल्या 8 महिन्यांत हा आकडा वाढला असल्याचे उपायुक्त किशोर बोर्डे यांनी म्हटले आहे. 33 इमारतींना नोटिसा बजावल्यानंतर त्यांचे पुढे काय करायचे याबाबतचा निर्णय आयुक्तांच्या कोर्टात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कशा ठरतात धोकादायक इमारती?
इमारत धोकादायक झाल्याचे कसे ठरवावे याबाबतचे काही निकष आहेत. मात्र, पालिका प्रशासन या फंदात पडत नाही. भाडेकरू इमारत सोडत नाही म्हणून घरमालकाकडून अर्ज येतो. माझी इमारत धोकादायक झाली असून ती पाडण्यात यावी, अशी त्याची मागणी असते. त्यानंतर पालिका कर्मचारी, अधिकारी पाहणी करून तसा अहवाल देतात आणि त्या इमारतीवर धोकादायक असा शिक्का मारला जातो. गेल्या 20 वर्षांपासून पालिकेत हीच पद्धत सुरू आहे. भाडेकरू घर सोडत नाही आणि मालक अर्ज विनंत्या थांबवत नाही. त्यामुळे दरवर्षी धोकादायक इमारतींची यादी आपोआपच अपडेट होत राहते. पालिका अधिकारी आपणहून कधी शहरात फिरून धोकादायक इमारत बघून आले असे होत नाही.