आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Administration,Latest News In Divya Marathi

डेंग्यूने घेतला स्वराजचा बळी; लागण झालेली धाकटी बहीणही रुग्णालयात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गेल्या महिनाभरात झपाट्याने पसरलेल्या डेंग्यूच्या साथीने एका बालकाचा मृत्यू झाला असून त्याच्याच धाकट्या बहिणीलाही डेंग्यूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे मनपा कोमात असल्यासारखी ढिम्मच आहे. स्वराजचा रिपोर्ट आल्यावर त्याच्या मृत्यूचे कारण कळेल. मग उद्या पाहणी करू, असे प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर यांनी सांगितले. एका अंदाजानुसार शहरात आजघडीला 400 ते 500 रुग्ण विविध रुग्णालयांत डेंग्यूवर उपचार घेत आहेत. दुसरीकडे मनपाच्या लेखी 110 संशयित रुग्ण आहेत. सिडको, हडकोला डेंग्यूच्या साथीचा सर्वाधिक फटका बसला असून एन-8, एन-9, एन-11 भागांत डेंग्यूचे अधिक रुग्ण आहेत. याच एन-11 मधील दीपनगरातील चार वर्षे दोन महिने वयाच्या स्वराज कैलास कुंटे या बालकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. गेल्या शुक्रवारपासून तो आजारी होता. प्रारंभी हडकोत उपचार केले. पण सोमवारी रात्री स्वराजची डेंग्यूची चाचणी घेतली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नंतर त्याची प्रकृती बिघडल्यावर हेडगेवार रुग्णालयात नेले. तेथे डॉ. अभिषेक परळीकर यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याने प्राण सोडला. आज दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले.
9 महिन्यांची चिमुरडीही रुग्णालयात
स्वराजचे वडील कैलास कुंटे हे वोक्हार्ट कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतात. ते म्हणाले, शुक्रवारपासून स्वराज तापाने फणफणला होता. त्याच्या प्लेटलेट्सची संख्या कमी होत गेली. लाइफलाइन रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले, पण मंगळवारी स्वराजची तब्येत आणखीच खराब झाल्यावर मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. काल तो गेला. त्याची धाकटी बहीण हिंदवी 9 महिन्यांची आहे. तिलाही दोन-तीन दिवसांपासून ताप आहे. आज बुधवारी दुपारी तिलाही वरद रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचाही डेंग्यू तपासणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कैलास कुंटे यांनी सांगितले. अहवाल आला नाही : या घटनेबाबत मनपाच्या प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर म्हणाल्या की, या घटनेची माहिती आम्हाला मिळाली आहे. चाचण्यांचे अहवाल मिळालेले नाहीत. उद्या आमचे अधिकारी पाठवून तपासणी करणार आहोत. नंतरच त्यावर भाष्य करता येईल.
सिडको-हडकोत अधिक रुग्ण : उपलब्ध आकडेवारीनुसार अ वॉर्डात 11, ब मध्ये 32, क मध्ये 3, ड मध्ये 12, इ मध्ये 15 तर फ मध्ये 7 संशयित रुग्ण आहेत. सर्वाधिक 32 रुग्ण असणा-या ब वॉर्डात सिडको आणि हडकोचा परिसर येतो. गेल्या पंधरवड्यात एन-8, एन-11 या भागांत डेंग्यूच्या संशयित रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. तसेच इ वॉर्डात मुकुंदवाडी, चिकलठाणा, एन-3, एन-4, एसटी कॉलनी, गजानन कॉलनी, पुंडलिकनगर आदी टापू येतो. याच भागातील 15 रुग्ण विविध रुग्णालयांत भरती आहेत.
फवारणीची बोंब : ब आणि इ या दोन वॉर्डांत औषध फवारणीच्या कामाचे खासगीकरण करण्यात आले आहे. 4 ठेकेदारांचे 48 मजूर या कामांवर आहेत. सव्वा कोटी रुपयांच्या कामांचा ठेका त्यांना देण्यात आला आहे. त्याच दोन वॉर्डात डेंग्यूचे सर्वाधिक संशयित रुग्ण असल्याने त्यांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कैलास कुंटे यांनीही महापालिका पैसा कुठे खर्च करते, असा सवाल करीत मनपाच्या नाकर्तेपणावर बोट ठेवले.
लोकहो, एवढे कराच
डेंग्यूचा मुकाबला पालिका करेल न करेल; पण नागरिकांनीच आता आपली काळजी घेण्याची परिस्थिती उद्भवली आहे. डेंग्यू हा व्हायरल ताप असल्याने योग्य काळजी व वेळीच उपचार केल्यास मुकाबला करता येतो, असे सांगत प्रसिद्ध फिजिशियन डॉ. आनंद देशमुख यांनी पुढील महत्त्वाच्या टिप्स दिल्या.
मनपाने काय करायला हवे?
साचून राहणा-या पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. तुंबलेल्या नाल्या, खड्डे यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी.
युद्धपातळीवर औषध फवारणीचे काम हाती घेण्याची गरज आहे. दिवसात दोन ते तीन वेळा फवारणी केली जावी.

नगरसेवक, मनपा अधिकारी यांनी वॉर्डांत जाऊन नागरिकांना जागरूक केले पाहिजे. शिवाय औषधींची उपलब्धता करून द्यावी. स्वच्छतेच्या बाबतीत कुचराई न करता हे काम तातडीने हाती घ्यावे. पावसामुळे या ठिकाणीच डासांची संख्या अधिक असते.
शहरात सगळीकडे डेंग्यूची साथ पसरली असून मनपाच्या बेजबाबदार कारभारामुळेच ही अवस्था झाली. नागरिकांचे मृत्यू होईपर्यंतही मनपा काहीच हालचाल करीत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अभिजित देशमुख, नगरसेवक
मागील महिन्यापासून एन-11, एन-9 या भागांत डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यानंतर या भागात सातत्याने फवारणी केली जात आहे. महापालिकेच्या वतीने आणखी उपाययोजना तातडीने केल्या जातील. किशोर नागरे, नगरसेवक आणि सभागृह नेते