आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Administration,Latest News In Divya Marathi

28 कर्मचा-यांच्या जिवावर मोहीम डेंग्यूग्रस्त भागात मोहीम सुरू, कमी मनुष्यबळामुळे मोहीम मंदावणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डेंग्यूने दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी मनपा आयुक्तांनी जाहीर केलेले कोम्बिंग ऑपरेशन आज अवघ्या 28 कर्मचा-यांच्या जिवावर मनपाने सुरू केले. एन-11 च्या 10 हजार घरांच्या परिसरात फॉगिंग, औषध फवारणी करण्यासाठी तुटपुंजे मनुष्यबळ लावण्यात आल्याने कसेबसे 4 हजार घरांपुरते काम आज करण्यात आले. दरम्यान, पुढील टप्प्यात या मोहिमेत मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे, असे मनपाने जाहीर केले.
स्वराज कुंटे आणि अश्विनी बोलकर या दोघांचा डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या मनपाने आजपासून एन-11 व एन-9 भागात युद्धपातळीवर मोहीम राबवण्याची घोषणा केली होती. आज त्याचा प्रारंभ एन-11 भागातून करण्यात आला. दहा हजार घरांच्या टापूतील या मोहिमेसाठी प्रत्येक कर्मचा-याला 100 घरांचे टार्गेट देण्यात आले होते. त्यानुसार सकाळी सहा वाजता फॉगिंगच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. 6 मशीनच्या साहाय्याने ही धूर फवारणी करण्यात आली. त्यानंतर औषध फवारणीचे काम हाती घेण्यात आले. नाल्या, कच-याची ठिकाणे, घरांसमोरचा परिसर येथे फवारणी केली जात होती. याशिवाय घरांत जात कर्मचा-यांनी साठवलेल्या पाण्याची तपासणी करून काही ठिकाणी हे पाणी ओतून द्यायला लावले. तसेच येथे नागरिकांना पाण्यात टाकण्यासाठी अ‍ॅबेटच्या औषधाचा पुरवठा करण्यात आला.
पुढा-यांच्या भेटी
डेंग्यूबाबत ‘दिव्य मराठी’ने मनपाला जागे केल्यानंतर ही मोहीम सुरू झाली. आज या मोहिमेची पाहणी करण्याकरिता नेत्यांनीही हजेरी लावली. एन-11 भागात महापौर कला ओझा, आमदार प्रदीप जैस्वाल, नगरसेवक व सभागृह नेते किशोर नागरे, नगरसेवक राज वानखेडे यांनी पाहणी केली. ही मोहीम डॉ. संध्या टाकळीकर यांच्या नेतृत्वाखाली चालवली जात आहे.
कमी मनुष्यबळामुळे अडचण
मनपाने 500 कर्मचारी सहभागी होणार असे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात 28 कर्मचा-यांनीच हे काम केले. यामुळे दोन दिवसांत डेंग्यूग्रस्त भागात मनपा मोहीम कशी राबवणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तिकडे मनपात मनुष्यबळ उभे करण्याबाबत चर्चेचे गु-हाळ सुरू होते.
बैठका आणि नियोजन
काल सायंकाळी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर व इतर अधिका-यांची बैठक घेतली. त्यानंतर डॉ. टाकळीकर यांनी मनपाच्या सर्व डॉक्टरांची बैठक घेतली. रात्री आठ वाजता मोहिमेच्या नियोजनासंदर्भात आयुक्तांनी या सर्वांची आणखी एक बैठक घेतली. त्यानंतर आज सकाळी एन-11 भागात मोहीम सुरू झाली. दुसरीकडे सायंकाळी पुन्हा मनपा आयुक्तांनी बैठक बोलावून उद्यापासून बचत गट व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना सहभागी करून घेण्याच्या सूचना केल्या.
ही कामे करण्यात आली
घरांसमोरील, परिसरातील रांजण, कूलर, झाडांच्या कुंड्या यात साठवलेले पाणी सांडून देण्यात आले. गटारींवर औषध फवारणी करण्यात आली. तसेच डासांची उत्पत्ती होऊ शकणा-या ठिकाणांवर फवारणी केली. घराघरांत साठवलेल्या पाण्यात टाकण्यासाठी अ‍ॅबेट औषध वाटण्यात आले.
सकाळी फॉगिंग मशीनद्वारे एन-11 भागात धूर फवारणी करण्यात आली.
काय केली घोषणा?
500 कर्मचा-यांचा ताफा करणार कोम्बिंग आॅपरेशन
एन-11, एन-9 भागात दोन दिवस युद्धपातळीवर मोहीम
फॉगिंग, अ‍ॅबेट वाटप, औषध फवारणी करणार
आठवडाभरात सगळे शहर पिंजून काढणार

प्रत्यक्षात काय झाले?
फक्त एन-11 भागात झाली मोहीम
मनपाच्या 28 कर्मचा-यांचा ताफा मोहिमेत
बचत गट, नर्सिंग कॉलेजचा सहभाग नाही
दिवसभरात दोन वेळा केले फवारणीचे काम