औरंगाबाद- शहरातील ३७ वसाहतींना डेंग्यूच्या संसर्गासाठी अतिधोकादायक घोषित करण्यात आले आहे. यात मुकुंदवाडीबरोबरच सिडको एन-४ आणि एन-२ या चकाचक समजल्या जाणा-या वसाहतींचाही समावेश आहे. या सर्व वसाहतींमध्ये मंगळवारपासून चार दिवस विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यात सर्व प्रकारच्या औषध फवारणीबरोबरच गप्पी मासे सोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
अन्य भागांपेक्षा जास्ताची डास संख्या हे अतिधोकादायक परिसर घोषित करण्याचे एकक आहे. शहरात आतापर्यंत डेंग्यूमुळे सहा जणांचे बळी गेले असले, तरी त्याबाबतचे अधिकृत अहवाल अजून प्राप्त झालेले नाहीत; परंतु या आजाराने धुमाकूळ घातल्याचे समोर आल्यानंतर पालिका प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली. शहरात डेंग्यू आहे, हेच मान्य करण्यास पालिका प्रशासन राजी नव्हते. सक्तीच्या रजेवरून डॉ. जयश्री कुलकर्णी परतल्यानंतर शहरात ३७ वसाहती अतिधोकादायक असल्याचे मान्य करण्याबरोबरच येथे विविध उपाययोजना हाती घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
९ पासून विशेष मोहीम
या वसाहतींतील डासांचे निर्मूलन करण्यासाठी येत्या ९ ते १३ सप्टेंबरदरम्यान येथे विशेष मोहीम हाती घेतली जाईल. यात साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, ऑइल टाकणे, मलेरिया तसेच अन्य डास निर्मूलनाचे औषध फवारणे, अॅबेट औषध टाकणे आदी कामे केली जातील. मोकळ्या जागा तसेच घरांच्या गच्चीवर साचलेल्या पाण्यातही औषध टाकले जाईल.
अहवालानंतर ठरणार पुढे काय?
पुणे येथील तज्ज्ञांच्या पथकाने काल शहरात येऊन पाहणी करण्याबरोबरच माणसांचे रक्त तसेच डासांचे नमुने घेतले. त्यांचा अहवाल सात दिवसांनंतर येणार आहे. तो अहवाल आल्यानंतर पुढे काय उपाययोजना करायच्या हे ठरणार आहे. हे डास कशाचे हे त्या अहवालानंतर समोर येईल.