आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांना निमंत्रण, अन् आम्हाला टाळले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मंत्रिमंडळ बैठकीसाठी शहरात येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार अतुल सावे यांनी जेवणाचे निमंत्रण दिले आहे. पालकमंत्री मी सत्ताधारी पक्षात असूनही मला जेवायला बोलावले नसल्याची खंत आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. तर आपले म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांना जेवायला बोलावले, मला नाही, असा टोला पालकमंत्री रामदास कदम यांनी सावे यांना लगावला. हे सर्व मानपान नाट्य घडले ते सोमवारी आयोजित मनपा सफाई कामगारांच्या सत्कार कार्यक्रमात.

मनपाने सुरू केलेल्या महास्वच्छता अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई कामगारांचा सत्कार सोहळा सोमवारी संत तुकाराम नाट्यमंदिरात दुपारी दोन वाजता आयोजित केला होता. पालकमंत्री कदम यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, सफाई कामगारांमुळेच शहर स्मार्ट होऊ शकते. सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करणारी ही पहिलीच महानगरपालिका आहे. येत्या काळात सफाई कामगारांना सेवेत कायम करून चांगले वेतन द्यावे. दारू पिऊ नका, असा सल्लाही त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला. आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण द्या. मुलांना प्रशासकीय सेवेत अधिकारी बनवा, कशाचीही गरज भासली तर मला सांगा मी, सहकार्य करेन, असे ते म्हणाले. शहर स्मार्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन केले.

नवीनआकृतिबंधाला मंजुरी द्या :वाढत्या शहरासाठी केवळ १६३६ सफाई कर्मचारी असून नवीन आकृतिबंध शासनाला दिला आहे. त्याला मंजुरी देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती महापौर त्र्यंबक तुपे यांनी केली. प्रास्ताविक मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केले. या वेळी आमदार अतुल सावे, आमदार शिरसाट, आमदार इम्तियाज जलील, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेता राजेंद्र जंजाळ यांनी मनोगत व्यक्त केले. चार वॉर्डांतील २७ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, विरोधी पक्षनेता अय्युब जहागीरदार, शिवसेना गटनेते राजू वैद्य, नगरसेवक नंदू घोडेले, शिवाजी दांडगे, मनोज गांगवे, नगरसेविका पुष्पा रोजतकर, स्वाती नागरे, ज्योती पिंजरकर, शिल्पाराणी वाडकर, अर्चना नीळकंठ, अंकिता विधाते, अब्दुल नाईकवाडी, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख शिवाजी झनझन उपस्थित होते.

आमदार सावेंना लगावला टोला : पालकमंत्रीकदम यांनी सावे यांचा स्वभाव म्हणजे “आपण दोघे भाऊ मिळून तुझं खाऊ, माझ्या गठडीला हात नको लावू’ असा टोला लगावला. स्वच्छतेसाठी पहिल्यांदा शरद पवार यांनी हातात झाडू घेतला. मीसुद्धा स्वच्छता केली. मात्र सावे यांनी माझे नाव स्वच्छतेसाठी घेतले नसल्याचे सांगत ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, अशी कोपरखळी मारली. सावे यांना स्मार्ट सिटी म्हणजे काय, असा प्रश्न करून स्मार्ट मुख्यमंत्र्यांसारखे दिसणे नागरिकांनीही तसेच राहणे याला स्मार्ट म्हणावे का, असा चिमटा काढला. फोटोसाठी स्वच्छता करता सर्वांनी स्वच्छता मोहीम राबवावी असे आवाहन केले. आमदार शिरसाट म्हणाले, सीएमना जेवायला बोलावले, पण मला नाही. त्यावरून तुमचे किती प्रेम आहे, हे दिसून येते. उद्या जेवताना सीएमना सांगा की, मी ज्या भागात राहतो, तिथले रस्ते खराब झाले असून त्याची दुरुस्ती करण्यासाठी २०० कोटींचा प्रस्ताव द्या. हा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याचे सांगा, असा सल्लाही दिला.

जैस्वाल राहिले एकटे
दुपारी तीन वाजेपर्यंत मुख्य कार्यक्रम संपून नगरसेवकांसह सर्वच अधिकारी, पदाधिकारी, नेत्यांनी नाट्यगृह सोडले होते. पालकमंत्र्यांच्या ताफ्यात कदम यांच्यासोबत शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वालही होते. कदम बाहेर पडताना जैस्वाल काही कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतानाच ताफा निघून गेला. त्यामुळे जैस्वाल एकटेच मागे राहिले. शेवटी मनपाच्या एका अधिकाऱ्यासह जैस्वाल यांना रामा हॉटेल गाठावे लागले.
बातम्या आणखी आहेत...