आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपा आयुक्तांची कठोर टीका, शहरात फिरायचीही मला लाज वाटते...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्रशासकीय अधिकारी म्हणून मी अनेक शहरांत फिरलो, पण औरंगाबादसारखे शहर पाहिले नाही. अहो.. या शहरात झाडेच नाहीत, रस्त्याच्या दुभाजकावरची झाडे लोक चोरतात. मला तर या शहरातून फिरायचीदेखील लाज वाटते, अशी टीका महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांनी महापौर, उपमहापौरांच्या समक्ष केली. तेव्हा तमाम उद्योजकही अवाक झाले.
सीएमआयएतर्फे नवनिर्वाचित महापौर त्र्यंबक तुपे उपमहापौर प्रमोद राठोड यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी उद्योजकांनीही हजेरी लावली होती. आयुक्त प्रकाश महाजन यांना उद्योजकांच्या विकासाच्या संकल्पना ऐकून घेण्यासाठी महापौरांनी आग्रहपूर्वक बोलावले होते. मनपा आयुक्त सीएमआयए कार्यालयात येण्याची पहिलीच वेळ असल्याने उद्योजकांचे त्यांच्या बोलण्याकडे विषेश लक्ष होते. महापौर,उपमहापौरांनी अभ्यासपूर्ण भाषण केले.

उद्योजकांच्या समस्या आस्थेने एेकल्या. पण मनपा आयुक्तांनी भाषणाची सुरुवातच नकारात्मक मूडने केली. ते म्हणाले, तुमच्या योजना चांगल्या आहेत... पण या शहरातील नागरिकांना शिस्त नाही. दुभाजकावरचीदेखील झाडे चोरून नेतात.. व्हाॅट इज धिस... त्या ठिकाणी शोभेची नव्हे, तर काटेरी झाडे लावली पाहिजेत. मी महाराष्ट्रातील अनेक गावे पाहिली, पण औरंगाबादसारखे गाव नाही पाहिले. अहो.. या शहरात झाडेच नाहीत.. असा एकही रस्ता नाही जेथून वॉक करावा वाटेल... मला या शहरातून फिरायचीदेखील लाज वाटते. आयुक्तांची ही मुक्ताफळे ऐकून उद्योजक अवाक झाले. मनपा प्रशासनाचा सर्वोच्च अधिकारी इतका नकारात्मक कसा असू शकतो, अशी चर्चा उद्योजकांत सुरू होती.
नकार घंटेला ब्रेक
उद्योजकांनी आयुक्तांना उपाय सुचवले. ते म्हणाले, साहेब... येथे रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करा. त्यावर आयुक्त म्हणाले, अहो ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही... लोक त्याची पाइपलाइन उखडून चोरून नेतील. सरकारी पाइप आपलाच आहे, असं लोक समजतात. व्हाॅट टाइप ऑफ मेंटॅलिटी इज धिस? काही उद्योजकांनी धाडसाने प्रश्न केला. साहेब, तुम्हीच जर असे बोललात तर कसे होईल? आम्ही स्वच्छता अभियान सुरू केले, त्याला तुमचे सर्व स्वच्छता कर्मचारी येतात. आम्ही त्यांच्यात सकारात्मकता आणू शकतो, त्यासाठी निदान पॉझिटिव्ह तरी बोलले पाहिजे. महापौर तुपे म्हणाले, आयुक्त साहेब खूप सीनियर आहेत, त्यांचा अनुभव मोठा आहे.
आयुक्त साहेब, तुम्ही आता रिटायर होणार आहात, आठ महिने बाकी आहेत. असे काम करा की लोकांनी तुमचे नाव घेतले पाहिजे. तुम्हाला भेटणाऱ्यांची रांग लागली पाहिजे. आयुक्तांच्या भाषणाने उद्योजकांचा चांगलाच हिरमोड झाला.
बातम्या आणखी आहेत...