औरंगाबाद- आचारसंहिता सुरू होताच आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी धडाक्यात कामांना प्रारंभ केला असून आज त्यांनी सिद्धार्थ उद्यानाला भेट देत तेथे कृत्रिम धबधबा उभारण्याची घोषणा केली. या कामाला उद्यापासूनच प्रारंभ होत असून 14 एप्रिल रोजी या धबधब्याचे उद्घाटन करण्याचा मानस आहे. याशिवाय रंगीन दरवाजाच्या सुशोभीकरणाचेही काम हाती घेण्यात आले असून लवकरच आज तो सजावटीनंतर खर्या अर्थाने ‘रंगीन’ दरवाजा बनणार आहे.
आयुक्त डॉ. कांबळे यांनी आज सिद्धार्थ उद्यानाला भेट दिली. तब्बल दीड तास त्यांनी उद्यानाची पाहणी केली व उद्यानाच्या अधिकारी-कर्मचार्यांशी चर्चा केली. उद्यानात उभारण्यात येणार्या कृत्रिम धबधब्यासंदर्भात त्यांनी सूचना दिल्या. डॉ. कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्यानात प्रवेश करतानाच लागणार्या फुटओव्हर ब्रिजजवळ हा धबधबा उभारला जाणार असून त्यासाठी तब्बल 70 मीटरचा जलप्रवाह तयार केला जाणार आहे. या धबधब्यातील खळाळते पाणी आणखी आकर्षक दिसावे यासाठी कारंजे आणि रंगीबेरंगी दिवे लावले जाणार आहेत. या कामाला 60 लाख रुपये खर्च येणार असून उद्या, शुक्रवारपासून या कामाला प्रारंभ होणार आहे. आयुक्त म्हणाले की, येत्या महिनाभरात हे काम पूर्ण केले जाणार असून 14 एप्रिल रोजी या धबधब्याचे उद्घाटन केले जाणार आहे.
रंगीन दरवाजाचे नशीब उघडले
सुभेदारी विर्शामगृहासमोरील रंगीन दरवाजाचे नशीब उजळले असून याच्या सुशोभीकरणाची नोव्हेंबर महिन्यात आयुक्तांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात आली आहे. 20 लाख रुपये खर्च करून या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना सुशोभीकरणातून सौंदर्य मिळवून दिले जाणार आहे. आयुक्त म्हणाले की, दोन्ही बाजूंना लॉन लावून हिरवळ विकसित केली जाईल व कारंजी उभारली जातील. तसेच प्रकाश योजना केली जाणार आहे. या दरवाजालगतच्या बागेत खास चाफ्याची झाडे लावली जाणार आहेत. हे काम आजपासूनच हाती घेण्यात आले आहे.