औरंगाबाद - मनपात शिवसेना-भाजपची निर्भेळ सत्ता आली. याचा सर्वांनाच आनंद झाला असला तरी याची संक्रांत मात्र आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावर येण्याची चिन्हे आहेत. येत्या १५ दिवसांत पालिकेला नवीन आयुक्त मिळेल, असे संकेत आहेत.
पालकमंत्री रामदास कदम वगळता खासदार चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट यांचा महाजन यांच्या नावाला विरोध आहे. कदम महापौर तुपे यांनी मात्र आहे त्यावर धकवून घ्या, असे म्हटले आहे; परंतु स्थानिक नेते जर विरोध करत असतील तर एका मिनिटात आयुक्तांची बदली करू, असे कदम यांनी स्पष्ट केले आहे. त्याच जोरावर स्थानिक सर्व नेत्यांनी महाजन यांच्या बदलीचा आग्रह धरला आहे.
कुमार इच्छुक, पण मराठी माणूस हवा
सूत्रांच्यामाहितीनुसार, येथे आयुक्त म्हणून येण्यास अमराठी व्यक्ती इच्छुक आहे; परंतु युतीची सत्ता असताना येथे मराठीच माणूस हवा, असा आग्रह महाजन यांची बदली करण्याची इच्छा असणार्यांनी धरला आहे. त्यामुळेच बदलीला विलंब होत असल्याचे सांगण्यात येते. कुमार आडनाव असलेले तिघे इच्छुक असल्याचे समजते.