आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएम आयुक्तांच्या पाठीशी, शिवसेना-भाजपची पुन्हा कोंडी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणायचा की नाही, यासाठी सोमवारी (दि. १२) मनपात सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक होत असतानाच आपण आयुक्तांना हटवण्याच्या विरोधात असल्याचे एमआयएमने जाहीर केले आहे. दुसरीकडे सूत्रांनी सांगितले की ऊठसूट आयुक्तांच्या विरोधात मुंबईत तक्रारी केल्याने नगरविकास खात्यात औरंगाबाद मनपाची प्रतिमा खराब झाली असून त्याचाही विचार पदाधिकाऱ्यांना करावा लागेल.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांना गेंड्याच्या कातडीचे, असे नगरसेवकांनी संबोधल्यानंतर आयुक्त बकोरियांसह अधिकारी सभेतून बाहेर पडले. त्यानंतर आयुक्तांना परत पाठवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. शिवसेनेचे पदाधिकारी पालकमंत्री रामदास कदम यांना भेटले, तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भोकरदनला जात प्रदेशाध्यक्षांकडे तक्रारी केल्या. उद्या महापालिकेत सर्वच पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावण्यात आली असून त्यात आयुक्तांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणायचा की कसे, यावर चर्चा होणार आहे. सूत्रांनी सांगितले की, पालकमंत्र्यांनी तुमच्या पातळीवर निर्णय घ्या, असे सांगितले असले तरी प्रत्येक वेळी आयुक्तांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या पदाधिकाऱ्यांबद्दल ते नाराज आहेत. आयुक्तांकडून काम करून घेणे जमत नसल्याचे त्यांचे मत झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
अधिकाऱ्यांकडूनच वातावरण निर्मिती : आयुक्तांचासभात्याग नंतरचे पानझडे यांचे निलंबन हे एकमेकांशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. शहर अभियंता सखाराम पानझडे त्यांची लाॅबी हाताशी धरून आपल्याच पोळीवर तूप ओढून घेणाऱ्या बड्या नगरसेवकांना चाप लावल्याने अधिकाऱ्यांच्या एका गटाने आयुक्तांच्या विरोधात वातावरण निर्मिती सुरू केली. त्यातून अविश्वास ठरावापर्यंत स्थिती आणण्यात त्यांना यश आले. काही मोजके नगरसेवक मनपाच्या तिजोरीत पैशांची वानवा असतानाही गुपचूपपणे काही कोटींची कामे मंजूर करून घेतात, असे समोर आल्यावर आयुक्तांनी प्रत्येक कामावर त्या वाॅर्डातील हे कितवे किती रकमेचे काम अाहे, याची यादीच करण्यास सांगितले. त्यात अनेक नगरसेवकांचे बिंग फुटले ही कामे पुढे सरकवणाऱ्या अधिकाऱ्यांचेही चेहरे उघड झाले. या सगळ्यांत शहर अभियंता म्हणून पानझडे यांची जबाबदारी असल्याने तेही आयुक्तांच्या निशाण्यावर आले. आयुक्तांनी प्रत्येक वाॅर्डात एक कोटी रुपयांची कामे असा समान न्याय मंजूर नसलेल्या बड्यांना उचकावत अधिकाऱ्यांच्या लाॅबीने आयुक्तांच्या विरोधात वातावरण तयार करण्यास मदत केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच आयुक्तांनी पानझडेंचे निलंबन करताच अधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती.

शहराचा विकास महत्त्वाचा : एमआयएम
सर्वपक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना रविवारी एमआयएमने सुरुंग लावला. एमआयएमचे शहराध्यक्ष अन्वर कादरी यांनी आपला पक्ष आयुक्तांना हटवण्याच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. आम्हाला शहराचा विकास महत्त्वाचा असून त्यात अधिकाऱ्यांना हटवणे योग्य नाही. शिवसेना भाजपच्या खेळीत आम्ही सहभागी होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...