औरंगाबाद-महापालिका आयुक्त म्हणून डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आज स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीला हजेरी लावली. सभापतींसह सर्वच सदस्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक करीत भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या. पण हे करताना त्यांचा जीव मात्र फायलींतच अडकला होता. जाता जाता आमच्या फायली मार्गी लावा असे रडगाणे गातच त्यांनी आयुक्तांना निरोप दिला.
मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची नागपूरला बदली झाली. त्याआधीच्या शेवटच्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली. या बैठकीत नवीन आलेले अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त बी. एल. पवार, व डॉ. आशिष पवार यांचे आधी स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्थायी समिती सदस्यांनी आयुक्त डॉ. कांबळे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडत त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र हे करताना गेल्या दीड वर्षात याच आयुक्तांवर
आपण टीका करायचो हे विसरून त्यांनी स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. याच ओघात त्यांनी पुन्हा आपल्या कामांचे रडगाणे सादर करणे काही सोडले नाही. काँग्रेसच्या सत्यभामा शिंदे यांनी जाहीरपणे आपल्या वॉर्डातील ८० लाख रुपयांचे काम करा अशी विनंतीच केली. त्या म्हणाल्या की, माझ्या वॉर्डातील स्पील ओव्हरचे ८० लाखांचे काम होते हो. ते वगळण्यात आले आहे. कसेही करा आणि हे काम करा अशी विनवणी त्यांनी केली. शिंदे यांची विनंती ऐकून भाजपचे नगरसेवक संजय चौधरी यांनाही हुरूप आला. ते म्हणाले की, आमच्या गुंठेवारीच्या ५-५ लाखांच्या काही फायली बाकी आहेत, तेवढ्या जाता जाता मार्गी लावा. त्यांच्या या मागण्यांवर सभागृहात हास्याची लकेर उमटली. आयुक्तांनीही आपल्या भाषणात त्याची दखल घेतली. ते म्हणाले की, शिंदेताईंच्या वॉर्डात आता ८० लाखांचे काम काही करता येणार नाही. पण जसे ठरले आहे तसे ३० लाखांपर्यंतचे काम मिळेल हे नक्की. चौधरींना उद्देशून बोलताना त्यांनी तुमची तर एकच फाइल बाकी होती ना, असे विचारून गप्प केले.
मी समाधानी : सभागृहाने केलेल्या कौतुकाला उत्तर देताना मावळते आयुक्त डॉ. कांबळे म्हणाले, समांतरच्या कामाबाबत कोणी काही म्हणो, पण मी समाधानी आहे.