आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपात भाजपचा असहकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विधान परिषद निवडणुकीत भाजपने दगाबाजी केल्याची कुजबुज वाढत चालल्याने अस्वस्थ झालेल्या भाजपने महानगरपालिकेत सत्ताधारी शिवसेनेसोबत असहकार पुकारला आहे. धोरणात्मक बाबींमध्ये मित्रपक्ष म्हणून विचारात घेतले जात नाही असे कारण सांगितले जात असले तरी ‘दगाबाज’ म्हणून लावलेले लेबल भाजपच्या जिव्हारी लागले आहे.

मागील महिन्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेचे किशनचंद तनवाणी यांचा पराभव झाला होता. शिवसेनेसोबतच भाजपचीही मते फुटल्याने तनवाणी यांनी लावलेली फील्डिंग उधळली गेली. या पराभवानंतर शिवसेनेकडून भाजपवर दगाबाजीचे खापर फोडले जात आहे. मनपात भाजपची किमान 5 ते 7 मते फुटली, असे सांगितले जाते. त्यामुळे या आरोपामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची मते फुटू शकतात, पण आमची नाही, असे सांगत भाजपचे नेते या वादापासून दूर राहू इच्छितात. पण त्यांची नाराजी कायम आहे. ही नाराजी असहकार पुकारून व्यक्त केली जात आहे.

भाजपचे दु:ख काय?
औरंगाबाद महानगपालिकेत शिवसेनेसोबत आपली कायम फरपट होते हे भाजपचे दु:ख आहे. युती असताना धोरणात्मक निर्णय घेताना विश्वासात घेतले जात नाही हे सांगताना भाजपचे पदाधिकारी म्हणतात की, भाजपला गृहीत धरले जाते. पानझडे यांच्या ठरावाच्या बाबतीतही तसेच झाले. शहरातील कामे तातडीने होण्यासाठी शहर अभियंता असायलाच हवा असे आमचे मत असल्याने आम्ही पाठिंबा दिला होता

अर्थसंकल्पामुळे अस्वस्थता
901 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात नमूद केलेली सगळीच कामे होऊ शकणार नाहीत हे समोर आल्यानंतर भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. आधीच विश्वासात घेत नाही, त्यात आता कामांना कात्री लावावी लागली तर अडचण होणार आहे. या मनपाचे 18 महिने बाकी आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत किमान सहा महिने तरी जाणार असल्याने कामे झाली नाहीत.

लोकांसमोर कोणत्या तोंडाने जायचे असा प्रश्न भाजपच्या नगरसेवकांना पडला आहे. धोरणात्मक बाबींसंदर्भात समन्वय समितीच्या माध्यमातून मार्ग काढला पाहिजे. पण ते होताना कुठेच दिसत नाहीत.

म्हणे असहकार नव्हे, नाराजी आहेच
दगाबाजीच्या आरोपामुळे भाजप दुखावला आहे का या थेट प्रश्नावर भाजपचे नेते काहीच बोलत नाहीत. गटनेते संजय केणेकर म्हणाले की, निवडणुकीतील निकालाचा विषय संपला आहे. भाजपने असहकार पुकारलेला नाही. तिन्ही उदाहरणांना स्वतंत्र कारणे आहेत. पण युतीतील मित्रपक्ष म्हणून धोरणात्मक निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतले पाहिजे अशी अपेक्षा करण्यात काही चूक आहे का? ती नाराजी आधीपासून आहेच.

अंधारात ठेवले जात नाही
निवडणुकीचा विषय तसा संपला आहे. भाजपला विश्वासात घेतले जात नाही हा आरोप चुकीचा आहे. प्रत्येक निर्णयाबाबत त्यांच्याशी चर्चा केलीच जाते. अंधारात ठेवून निर्णय घेतले जात नाहीत. याउपरदेखील भाजपला त्यांच्या नगरसेवकांची कामे होत नाहीत असे वाटत असेल तर त्यात निश्चित लक्ष घालू. गजानन बारवाल, एनडीए गटनेते

..तर विचार करावा लागेल
महापालिकेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना युतीतील घटक पक्ष म्हणून आम्हाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात असल्याने भाजप नगरसेवक नाराज आहेत. उणेपुरे 18 महिने कालावधी हातात असताना हे असेच सुरू राहिल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागणार आहेच. संजय केणेकर, भाजप गटनेते

नगरसेवकांच्या कामांसाठी पुढाकार घेऊ
महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. त्यांच्याशी समन्वय राखूनच कुठलाही धोरणात्मक निर्णय घेतला जातो. भाजप नगरसेवकांची कामे होत नसतील तर याबाबत महापौर आणि वरिष्ठ नेत्यांच्या कानावर ही बाब घालून भाजप नगरसेवकांच्या कामांसाठी आम्ही पुढाकार निश्चितच घेऊ. सुशील खेडकर, शिवसेना सभागृहनेते