आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Encroachment Office Issue Aurangabad

अतिक्रमणांना पालिका कर्मचार्‍यांचे आशीर्वाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रशासकीय विभागातील बांधकाम निरीक्षक आणि कनिष्ठ कर्मचार्‍यांच्याच आशीर्वादाने शहरात अतिक्रमणे होत आहेत, असा निष्कर्ष स्थायी समितीचे सभापती विकास जैन यांनी रविवारी बोलावलेल्या बैठकीत काढला. बैठकीला उपस्थित अतिक्रमण विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी मौन बाळगले.
प्रशासकीय अधिकार्‍यांकडील कामाचा व्याप लक्षात घेता कार्यालयीन कामासाठी एक आणि प्रत्यक्ष फील्ड वर्कसाठी एक असे दोन प्रशासकीय अधिकारी नियुक्त करण्याची शिफारस सभापतींनी या वेळी केली. यास नगररचना विभागाचे सहायक संचालक दीपक कुलकर्णी, प्रशासकीय विभागाचे मावळते प्रमुख दिलीप सूर्यवंशी, गुंठेवारी सेलचे प्रमुख जयंत खरवडकर, उपअभियंता वसंत निकम, अविनाश देशमुख यांच्यासह इमारत निरीक्षक उपस्थित होते.
अशी होतात अवैध कामे - एखाद्या जागेवर अनधिकृतपणे बांधकाम सुरू झाल्याची माहिती सर्वप्रथम बांधकाम निरीक्षकाच्या हाताखाली काम करणार्‍या कर्मचार्‍याला असते. ही माहिती बांधकाम निरीक्षकाला देण्याऐवजी तो बांधकाम करणार्‍याशीच संपर्क साधतो आणि त्यानंतर आर्थिक व्यवहार होतो. दरम्यानच्या काळात माहिती निरीक्षकापासून दडवली जाते. निरीक्षकापर्यंत माहिती गेली तर तेथेही पुन्हा तसाच प्रकार घडतो आणि माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवली जात नाही. कधी कधी ‘या बांधकामाकडे लक्ष देऊ नका’ असा आदेश वरिष्ठांकडूनच देण्यात येतो.
अतिक्रमण विभागाची ओरड कायम - झपाट्याने वाढणार्‍या शहरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी या विभागातील मनुष्यबळ कमी असल्याची ओरड या विभागाकडून सातत्याने केली जाते. या बैठकीतही तोच सूर आळवला गेला. या विभागात 50 कर्मचारी कार्यरत आहेत. बांधकामांवर लक्ष ठेवण्यासाठी एवढी कर्मचारी संख्या पुरेशी असल्याचे जैन यांनी सांगितले आणि अधिकार्‍यांनीही माना डोलवल्या. त्यामुळे पथक प्रमुखाचा व्याप कमी करण्यासाठी कार्यालयीन कामकाज सांभाळणारा एक स्वतंत्र अधिकारी आणि एक जण फील्ड वर्कसाठी अधिकारी नेमण्याचे निश्चित करण्यात आले.
नगररचनाने हात झटकले - वैध बांधकामाला परवानगी देताना बांधकामाचा आराखडा मूळ मालकाला देण्याआधी आम्ही तो अतिक्रमण विभागाला देऊ शकतो, असा दावा नगररचना विभागाने केला. कोणत्या भागात वैध बांधकाम सुरू आहे, याची यादी कायम अधिकार्‍यांसोबत राहते. त्यामुळे त्याशिवाय बांधकाम सुरू असल्याचे दिसताच या विभागाच्या अधिकार्‍यांनी विचारणा केल्यास दोनच मिनिटांत आम्ही माहिती देऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला. मात्र प्रत्यक्षात अनेक फायली अभिप्रायासाठी या विभागाकडे पडून असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.
अतिक्रमणप्रमुख तीन वर्षांसाठी हवा - अतिक्रमण विभागाचा प्रमुख म्हणजेच प्रशासकीय अधिकार्‍याची अवघ्या काही महिन्यांतच येथून बदली होते. त्यामुळे एखाद्या अवैध बांधकामाला जबाबदार कोणाला धरायचे, असा प्रश्न समोर येतो. कोणालाही विचारले की माझ्या काळात फक्त एवढेच झाले होते, असे सांगून अधिकारी हात झटकतात. त्यामुळे यापुढे प्रशासकीय अधिकारी किमान तीन वर्षांसाठी ठेवावा, अशी सूचना सभापती जैन यांनी केली.