आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेने केले शुक्रवारपर्यंत 19 पार्थिवावर मोफत अंत्यविधी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महापालिकेतर्फे शहरात मोफत अंत्यविधी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम जयंतीचे औचित्य साधून बुधवारपासून (23 जानेवारी) हा उपक्रम सुरू करण्यात आला. त्याअंतर्गत शुक्रवारपर्यंत 19 मोफत अंत्यविधी करण्यात आले. या उपक्रमासाठी मनपाकडून महिन्याला 18 लाख तर वर्षभरात 2 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

अंत्यविधीसाठी साधारणपणे अडीच हजार रुपये खर्च येतो. सर्वसामान्य नागरिकांना तो परवडत नाही. याचा विचार करून 17 डिसेंबर 2012 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला. त्याची अंमलबजावणी बुधवारपासून झाली. जळगाव, नाशिक आदी ठिकाणीही हा उपक्रम सुरू आहे. शहरात 34 स्मशानभूमी आहेत. तेथे महिन्याला 450 ते 500 अंत्यविधी होतात. स्मशानभूमीत काम करणार्‍या स्मशानजोगींना उदरनिर्वाहासाठी दरमहा सहा हजार रुपये पगार देण्यात येणार आहे.

ज्यांना या मोफत योजनेचा लाभ घ्यायचा नाही, त्यांनी रक्कम नियुक्त केलेल्या व्यक्तीकडे जमा करून रीतसर पावती घ्यावी. ज्यांचा अंत्यविधी मोफत करण्यात आला त्यांचा खर्च एचडीएफसी बँकेत स्मशानजोगींच्या नावाने दर सोमवारी केला जाणार आहे. तसेच जिल्हाधिकार्‍यांना भेटून पाच लिटर रॉकेलची व्यवस्था करून देण्यात येणार आहे. त्यासाठी दररोज चार रेशन दुकान उघडी ठेवण्यात यावी, 24 तास रॉकेल मिळावे, अशीही मागणीही करण्यात आल्याचे उपमहापौर संजय जोशी यांनी सांगितले.