आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर म्हणाले, जबाबदारी झटकून चालणार नाही!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राकावर कारवाई होणारच, आयुक्तांनी केली नाही तर आम्ही करू; पण आयुक्तांनी जबाबदारी झटकू नये, असे महापौर त्र्यंबक तुपे म्हणाले. तर गेल्या दोन महिन्यांत मी आयव्हीआरएस, वायफाय, मनपाचे अँड्रॉइड अॅप, स्मशानभूमी दत्तक योजना यासह अनेक योजना सुरू करण्याबाबत पुढाकार घेऊन प्रस्तावांच्या फायली सादर केल्या, पण एकाही फाइलवर निर्णय झाला नाही, मी हताश झालो आहे, असे उद्गार उपमहापौर प्रमोद राठोड यांनी काढले. महापालिकेच्या दोन कर्त्याधर्त्यांनी महत्त्वाच्या विषयांवर आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावर शरसंधान करत आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे.
सध्या गाजत असलेल्या राका लाइफस्टाइल प्रकरणात सर्वसाधारण सभेने राकाचा करार रद्द करण्याची एकमुखी मागणी करूनही निर्णय घेतला गेला नाही. या संपूर्ण प्रकरणात मनपा प्रशासन खासकरून बीओटी कक्षप्रमुख सिकंदर अली यांनी चालढकल केल्याने कारवाईला वेळ लावल्याने राकाला लावलेले सील कोर्टाच्या आदेशाने काढण्याची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ होऊनही राकाबाबत प्रशासन काहीच निर्णय घेऊ शकले नाही. आता ती तहकूब झालेली सर्वसाधारण सभा शुक्रवारी होत आहे.

या सभेत तरी राकावर कारवाई होणार का, असा थेट प्रश्न महापौर त्र्यंबक तुपे यांना विचारला असता त्यांनी राकावर कारवाई होणारच, असे ठणकावून सांगितले. सोमवारच्या सभेतच आयुक्त त्यांच्या स्तरावर निर्णय घेऊन कारवाईची घोषणा करू शकत होते; पण तसे झाले नाही. आयुक्तांनी कारवाई केली नाही तर आम्ही करू, पण आयुक्तांनी जबाबदारी झटकायला नको, असेही ते म्हणाले. राकाचा करार रद्द झाला पाहिजे, अशी सभागृहाची भावना आहे, असे सांगत त्यांनी जर आयुक्तांनी कारवाई केली नाही तर सर्वसाधारण सभा तसा निर्णय घेऊ शकते, असेही सूचित केले. दरम्यान, महापौर आणि उपमहापौरांनी आयुक्तांवर शरसंधान केल्याने पुढील काळात आणखी संघर्ष वाढण्याची शक्यता महापालिकेच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

राकासंदर्भात निर्णय घेण्यासाठी नेमलेली समिती काय कारवाई करायचे हे निश्चीत करीत आहे. राठोड यांनी जे आक्षेप घेतले आहेत, त्यातील काही बाबी खर्चिक आहेत तर काहींबाबत पूर्ण विचारांतीच निर्णय घ्यावा लागणार आहे. घाईघाईने निर्णय घेऊन चालणार नाही. -प्रकाश महाजन, महापालिका आयुक्त.

लोकांच्या हितासाठी तत्परता का नाही ?
महापौरांनीराका प्रकरणात मनपा आयुक्त कडक निर्णय घ्यायला तयार नसल्याचे म्हटले आहे, तर दुसरीकडे उपमहापौर मात्र आयुक्तांच्या कामामुळे असमाधानी हताश आहेत. त्यांनी गेल्या तीन महिन्यांत आपण दिलेल्या कामांच्या प्रस्तावांचे काहीच झाले नसल्याने नाराजी व्यक्त करणारे पत्र आयुक्त महाजन यांना लिहिले.यात म्हटले आहे की, समांतरची बिले देताना दाखवत असलेली तत्परता नागरिकांच्या हितासाठी वापरली जात नाही प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपल्या वतीनेही कोणत्याच गोष्टीत पुढाकार घेतल्याचे दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

- मोबाइलच्या माध्यमातून मनपाच्या सेवा त्यांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी मनपाचे अँड्राॅइड अॅप असावे, असे ठरवण्यात आले. त्यानुसार आपण स्वत: लक्ष घालून मनपाचे अॅप बनवले. त्यासाठी मनपाने वेबसाइटचे सहकार्य द्यावे, यासाठीही प्रयत्न केले; पण यावर काहीच निर्णय झाला नाही की दखल घेण्यात आली नाही.

- शहरातील स्मशानभूमींचा विकास करून तेथे सौंदर्यीकरण करण्यात सामाजिक संस्था उद्योजकांना सहभागी करून घेण्याबाबत निर्णय घेतला होता. काही संस्था त्यासाठी तयारही झाल्या होत्या. या अशा अनेक फायलीवरही काहीच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

- मनपाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना एकाच क्रमांकावर सगळी माहिती मिळावी या हेतूने इंटर अॅक्टिव्ह व्हाइस रिस्पॉन्स सिस्टिम सुरू करण्याबाबतची फाइल आयुक्तांसमोर आली तेव्हा त्यांनी चर्चा करावी, असा अभिप्राय लिहिला पुढे त्याचे काहीच झाले नाही.

- महानगरपालिकेच्या कामाला वेग यावा इंटरनेटच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लागावीत यासाठी महानगरपालिकेची मुख्य इमारत वायफाय करण्याचा प्रस्तावही दिला होता; पण त्यावर चर्चा करा, असा शेरा मारण्यात आला. त्याचेही पुढे काहीच झाले नाही.