आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाजनांचा चुकीच्या ठिकाणी ‘प्रकाश’- आयएएस अधिकाऱ्यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजप गटनेते तथा नगरसेवक संजय केणेकर यांना पालिका आयुक्त प्रकाश महाजन यांनी धुळ्याची माणसे आणून हातपाय तोडण्याची दिलेली धमकी हा चुकीचाच प्रकार असल्याचे ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. महाजन यांनी स्वत:चा इगो म्हणून ही धमकी दिली असून याला क्षमा असता कामा नये, असे काहींनी म्हटले आहे, तर आपण जनतेची कामे करण्यासाठी असल्याने अशा संतप्त व्यक्तींना शांत करण्यासाठीच पगार मिळतो, असे उत्तर सध्या सेवेत असलेल्या काहींनी दिले.

आयुक्त किंवा कोणत्याही संस्थेचा प्रमुख हा कुटुंबप्रमुख असतो. त्याने सर्वांना सोबत घेऊन काम करणे, इतरांचे आपसातील वाद मिटवून पुढे जाणे अपेक्षित असते. पण तो स्वत:च जर वाद निर्माण करत असेल तर हे चुकीचे आहे. कुटुंबप्रमुख हा नेहमीच संयमी असावा. अन्यथा वरिष्ठ पद का निर्माण केले असते, याचेही भान महाजन यांनी ठेवायला हवे होते, असेही काही अधिकाऱ्यांनी खासगीत म्हटले आहे.

ही इज प्रकाश महाजन, नॉट ‘पीएम’
मुंबईस्थित एका अधिकाऱ्याने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की हा आयुक्त आहे. तो प्रकाश महाजन आहे. प्रकाश महाजन म्हणजे पीएम नव्हे. देशाचा पीएमही अशी भाषा वापरू शकत नाही. अशी भाषा पीएमने वापरली असती तर तो आतापर्यंत घरी गेला असता. आयएएस म्हणून जे संरक्षण मिळाले आहे, त्याचा असा दुरुपयोग होता कामा नये.
धमकी देण्यासाठी लायकी लागत नाही
धमकी देणे हे अशक्तपणाचे लक्षण आहे. त्यासाठी कोणतीही ताकद किंवा लायकी लागत नाही. त्यामुळे महाजन यांनी दिलेली धमकी अपयश, अशक्तपणा याच प्रकारात मोडते, असे मत पालिकेतून निवृत्त झालेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले. २७ वर्षांच्या सेवेत तंबी देणारे अधिकारी बघितले; पण धमकी देणारे अधिकारी कधी भेटले नाहीत, असेही ते म्हणाले.

महाजन चुकलेच
* धमकी देण्याचा अधिकार सामान्य नागरिकालाही नाही. तेथे ज्येष्ठ सनदी अधिकारी तर असे करूच शकत नाही. महाजन यांनी जे केले ते शतप्रतिशत चुकीचे आहे. याला कोठेही क्षमा नसावी. स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करताना संयम ठेवावा लागतोच. शासन यासाठीच पगार देते, स्वत:च्या इगोसाठी शासन पगार देत नाही, याचे भान ठेवले पाहिजे.
कृष्णा भोगे, निवृत्त सनदी अधिकारी.

* जे घडलेच नाही ते छापून आले. नगरसेवकांनाही काही मर्यादा असाव्यात. एखाद्या आर्थिक विषयात सभेच्या मंजुरीशिवाय आयुक्त काहीही करू शकत नाही. तरीही ते काम मी करावे असा आग्रह चुकीचा नाही का? त्यावरून त्यांनीच गोंधळ घातला अन् नंतर माध्यमांना त्यांनीच माहिती दिली. प्रसिद्धीसाठी त्यांनी माध्यमांना बरोबर आणले असावे असे मला वाटल्याने माध्यम प्रतिनिधींना मी बाहेर जाण्याची विनंती केली होती.
प्रकाश महाजन, आयुक्त, मनपा.
अपयश लपवण्याचा प्रयत्न
* नगरसेवकाला नागरिकांनी डिवचलेले असते. त्यामुळे तो कितीही रागाने बोलला तरी आपले काम आपण केले पाहिजे. अधिकाऱ्याने धमकी देणे म्हणजे आपल्या कर्तव्यापासून दूर जाणे होय. अपयश लपवण्यासाठी कदाचित असे घडले असावे.
औरंगाबाद पालिकेचे आयुक्त राहिलेला एक अधिकारी.