आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation, Latest News In Divya Marathi

मनपात बोनसचे वांधे; उत्पन्न घटले, अतिरिक्त आयुक्तांकडे आर्थिक अधिकार नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महापालिकेच्या तिजोरीत या महिन्यात खडखडाट झाल्याने पगार व बोनसचे वांधे झाले आहेत. त्यात ठेकेदारांची बिलेही थकल्याने त्यांनीही काम थांबवण्याचा इशारा दिला असून येत्या आठवडाभरात या सगळ्या कारणांवरून मनपात संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेच्या नियमित खर्चाचा भार प्रामुख्याने एलबीटीच्या उत्पन्नावर उचलला जातो. मनपाला दरमहा साधारण १९ कोटी रुपयांची एलबीटी अपेक्षित आहे. असे असताना आजमितीला मनपाच्या तिजोरीत अवघे सव्वादहा कोटी रुपये जमा झाले आहेत. शिवाय करवसुलीतही लक्षणीय वाढ झालेली नसल्याने मनपाचे उत्पन्न या महिन्यात कसेबसे 18 कोटींपर्यंत पोहोचले आहे. आता ऑक्टोबर महिन्यात मनपाला कर्मचाऱ्यांचे पगार व लगेच बोनस, सानुग्रह अनुदान द्यावे लागणार आहेत. आजची परिस्थिती अशी आहे की पगाराचे 12 कोटी व बोनससाठी लागणारे अडीच कोटी रुपये कसे उभे करायचे हा मनपासमोर प्रश्न
निर्माण झाला आहे.
लेखा विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनपाला या महिन्यात किमान 31 कोटी रुपये बिलांपोटी द्यावे लागणार आहे. ए वन व बी वनच्या कामांची ही बिले असून ठेकेदार चकरा मारून वैतागले आहेत. याशिवाय नियमित देणी व आता वाढलेला समांतर, भूमिगत गटार व एलईडी या कामांसाठीचे पैसे याचाही भार मनपावर आला आहे. अशा स्थितीत बोनसचा विचार करणेही अवघड बनले आहे. मनपातील 5300 कर्मचारी प्रशासन बोनसबाबत काय निर्णय घेते याकडे डोळे लावून आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे पदाधिकारी मनपात येत नसल्याने या विषयांची दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न पडला आहे.

आयुक्तांअभावी कामे ठप्प
स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे यांनी सांगितले की, मनपा आयुक्त प्रकाश महाजन निवडणुकीच्या कामासाठी हरियाणाला जाताना अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्याकडे आर्थिक व धोरणात्मक निर्णयाचे वगळून इतर अधिकार देऊन गेले आहेत. यामुळे सगळीच कामे ठप्प झाली आहेत. ठेकेदारांना कामाचे पैसे नाहीत, कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत निर्णय नाही, ही अवस्था चांगली नसल्याचे ते म्हणाले.