आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजेंद्र जंजाळांना मनपाची नोटीस, वादात आयुक्तांकडून आगीत तेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पालिकाआयुक्त विरुद्ध पदाधिकारी नगरसेवक अशी लढाई आणखी जोर धरणार असल्याचे आज स्पष्ट झाले. एकीकडे नगरसेवकांची मनधरणी करणारे आयुक्त डॉ. प्रकाश महाजन यांनी सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांना नगरसेवकपद रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटीस शनिवारी सायंकाळी जारी केली, तर केवळ सुडापोटी ही नोटीस देण्यात आली असून आपणच आयुक्तांविरोधात फौजदारी दाखल करू, असे जंजाळ यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

जंजाळ यांनी सिटी प्राइड येथील गाळा २०१० मध्ये तीन वर्षांच्या करारावर महिना ३० हजार रुपये भाड्याने घेतला होता. हा करार मार्च २०१३ मध्येच संपला. मात्र, गाळा सोडताना जंजाळ यांनी इलेक्ट्रिकल तारांचे नुकसान केले. त्यामुळे दीड लाख रुपये भरावेत, असेही नोटिसीत म्हटले आहे. हा गाळा अजून रिकामाच असून तो अजूनही जंजाळ यांच्याच ताब्यात असल्याचे गृहीत धरून नगरसेवक पालिकेची मालमत्ता भाडेतत्त्वावर घेऊ शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (फ) नुसार तुमचे नगरसेवकपद का रद्द करण्यात येऊ नये, असे पालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या नोटिसीत म्हटले आहे. दीड वर्षापूर्वीच पालिकेशी असलेला माझा करार संपला. त्यामुळे मी आता पालिकेचा भाडेकरू नाहीच. कलम १० (फ) येथे लागू होतच नाही. करार संपताना मी पालिकेला रीतसर पैसे भरले आहेत. दीड वर्षापासून तो गाळा पडून आहे. तेव्हा त्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. मी आयुक्तांच्या विरोधात बोललो म्हणून आता त्यांना जाग आली. उलट या काळात गाळा कोणाला भाड्याने दिल्याने पालिकेचे नुकसान झाले. केवळ राजकीय सुडापोटी तसेच माझी बदनामी करण्यासाठी मला ही नोटीस देण्यात आली. त्यामुळे मीच त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करणार असल्याचे जंजाळ यांनी सांगितले. प्रतिक्रियेसाठी आयुक्त उपलब्ध होऊ शकले नाहीत.