आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोंडीत पकडल्या गेलेल्या महापौर अखेर बॅकफूटवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यावरील अविश्वास प्रस्तावप्रकरणी भाजप, काँग्रेसने ठोस भूमिका घेण्यास नकार दिला. शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनीही आयुक्तांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोंडीत पकडल्या गेलेल्या महापौर अनिता घोडेले बॅकफूटवर आल्या आहेत. अविश्वासाचा प्रस्ताव चर्चेसाठी घेणारच नाही, असे त्यांनी रविवारी सांगितले.
त्या म्हणाल्या की, डॉ. भापकरांचे वर्तन अतिशय चुकीचे आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सभेत जेव्हा काँग्रेसचे नगरसेवक मुजीब आलम शाह यांनी त्यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव आणला. त्याच वेळी त्यावर मी त्यावर चर्चा घेऊ शकले असते, पण मला मनपात अस्थिरता आणायची नाही. आयुक्तांविषयी त्या वेळी माझ्या मनात कोणतीही नाराजी नव्हती. त्यामुळे प्रस्ताव तसाच ठेवला. पण भापकरांनी वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेतले नाही. मला साधी विचारणाही केली नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी मला व सर्व पदाधिकारी, नगरसेवकांना टीकेचे लक्ष्य केले. मनपात जर मोठे घोटाळे झाले असतील तर त्यास आयुक्तही तेवढेच जबाबदार आहेत. घोटाळ्यांचे प्रस्ताव सभेत चर्चेस आले तेव्हा त्यांनी अवाक्षरही काढले नाही. मग आताच त्यांना उपरती कुठून झाली? सगळेच धुतल्या तांदळाचे नाहीत आणि सगळेच भ्रष्टाचाराच्या दलदलीत बुडालेले नाहीत ही वस्तुस्थिती त्यांच्यासारख्या वरिष्ठ, अनुभवी अधिका-याने लक्षात घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वासाची तयारी केली होती, पण समांतर जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने खासदार खैरे भापकरांच्या बाजूने आहेत. भाजपचे प्रदेश सरचिटणीस खासदार रावसाहेब दानवे यांनीही प्रस्तावाशी संबंध नसल्याचे सांगितले. काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद अक्रम यांनीही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. राष्ट्रवादीकडूनही पाठिंबा मिळण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे हा प्रस्ताव चर्चेला घेतला जाणार नाही. माझी भूमिका नेहमीच सामंजस्याची राहिली आहे.
उत्पन्नाविषयी जाब विचारू - 20 जानेवारीला होणा-या सभेत आयुक्तांना मनपाच्या उत्पन्न वाढीविषयी जाब विचारू. आर्थिक स्थिती सुधारण्याची त्यांनी काय केले हे समोर आले पाहिजे, असे महापौर म्हणाल्या.