आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Remove Electricity Pole Issue At Aurangabad, Divya Marathi

जीटीएलच्या नादी न लागता मनपाच काढणार विजेचे खांब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या निमित्ताने भररस्त्यातील विजेचे खांब हटवण्याकडे मोर्चा वळवला असून मंदगतीने काम करणार्‍या जीटीएलच्या नादी न लागता दोन कोटी रुपये खर्चून महानगरपालिकाच हे काम करणार आहे. त्यामुळे जागोजागी प्राणघातक ठरलेले आणि रस्ते विकासात अडसर ठरलेले हे खांब एकदाचे हटणार आहेत. दरम्यान, आतापर्यंत केलेल्या कारवाईसंदर्भातील शपथपत्र मनपाच्या वतीने दोन जून रोजी न्यायालयात सादर केले जाणार आहे.
रस्ता रुंदीकरणात अडथळे ठरणारी धार्मिक बांधकामे व विजेचे खांब हटवण्याची मागणी करणारे नगरसेवक समीर राजूरकर यांनी एका याचिकेद्वारे केली होती. त्यात उच्च न्यायालयाने 41 धार्मिक बांधकामे व जीटीएलचे खांब 31 मेपर्यंत हटवण्याचे आदेश मनपाला दिले होते. महापालिकेने गुरुवारी धडाकेबाज कारवाई करीत 12 धार्मिक बांधकामे काढली. त्यात सहा मंदिरे व सहा दर्गे हटवण्यात आले. आता पालिकेला विजेच्या खांबांचा प्रश्न निकाली काढायचा असल्याने त्याबाबत हालचालींना आज वेग आला.

मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी शुक्रवारी मनपाच्या अभियंत्यांची बैठक घेत त्यात जीटीएलचे किती खांब काढावे लागतील व ते कसे आणि कधी काढायचे यावर चर्चा करण्यात आली. हे काम आता जीटीएलकडून न करून घेता मनपानेच करावे असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
आयुक्त डॉ. कांबळे ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले, खांब हटवण्याच्या कामाला जवळपास 2 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ज्या रस्त्यांचे रुंदीकरण केवळ खांबांमुळे अडकले आहे, तेथील काम आधी हातावेगळे केले जाईल.