आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Corporation, Satara Devlai Municipal Council Election May Postpone

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपा, सातारा निवडणुका लांबवण्याच्या हालचाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा-देवळाई नगर परिषदेची सोडत सोमवारी झाली. शनिवारी महानगरपालिकेच्या वॉर्डांची सोडत होणार आणि दोन्हीही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक एप्रिल महिन्यात होणार, असे गृहीत धरून सर्व जण कामाला लागले असले तरी या दोन्हीही निवडणुकांवर अजूनही टांगती तलवार आहे. कारण सातारा व देवळाई नगर परिषद करण्याऐवजी या परिसराचा समावेश महानगरपालिकेत करण्याचा पालिकेने मंजूर केलेला प्रस्ताव शासनदरबारी पोहोचला असून मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत त्यावर निर्णय होऊ शकतो.
विधी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाने निर्णय घेतला तर निवडणूक प्रक्रिया स्थगित करून नव्याने नोटिफिकेशन जारी होऊ शकते. कारण हा सर्वस्वी धोरणात्मक निर्णय आहे. त्यावर कोणतीही कायदेशीर अडचण येऊ शकत नाही.

शासनाने ठरवल्यास काय?
सातारा-देवळाईची स्वतंत्र नगर परिषद करण्याचा निर्णय रद्द करून या परिसराचा समावेश महानगरपालिकेत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला की तो आयोगाला कळवावा लागेल. शासनाने धोरणात्मक निर्णय घेतल्यास आयोग त्यानुसार सध्या सुरू असलेली प्रक्रिया थांबवेल. हद्दवाढीची अधिसूचना जारी केली जाईल. त्यावर आक्षेप-हरकती मागवल्या जातील. यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे २९ एप्रिलनंतर महापालिकेचा कालावधी संपताच प्रशासक नियुक्त केला जाईल. सातारा-देवळाई नगर परिषदेवर सध्या प्रशासक असल्यामुळे तेथे कोणतीही अडचण येणार नाही. समांतरचे पाणी असेही मिळणारच : या संभाव्य नव्या नगर परिषदेला स्वत:चा पाण्याचा स्रोत नाही. त्यांनाही जायकवाडीवरच अवलंबून राहावे लागणार आहे. समांतरच्या ठेकेदाराने त्यांना पाणी द्यावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्याने नकार दिल्यास त्यांना स्वतंत्र जलवाहिनी टाकावी लागेल. आर्थिकदृष्ट्या त्यांना ते परडवणारे नाही. मात्र, शहरात समाविष्ट झाले तर याची गरज पडणार नाही.

टीडीआरचाही होणार फायदा : महानगरपालिकेत टीडीआर वापरण्याचे नियम शिथील करण्यात आले आहेत. मात्र, नगर परिषदेचे टीडीआर वापरण्याचे नियम वेगळे आहेत. महानगरपालिकेत आल्यास टीडीआरचा फायदा बांधकाम व्यावसायिकांना तसेच फ्लॅट खरेदीदारांना होईल. फ्लॅट स्वस्त होण्यास टीडीआरमुळे फायदा होईल.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही मोठाच असेल : महानगरपालिकेच्या वतीने शहराच्या चारही बाजूंनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हाती घेतले आहेत. नगर परिषदेला यासाठी वेगळा खर्च करावा लागेल. मात्र, महानगरपालिकेत आल्यास या खर्च वाचेल अन् मोठा प्रकल्प हाती घ्यावा लागेल. त्यासाठी पालिकेकडे पैसे राखीव असून शासनाकडूनही मदत मिळेल.
रस्त्याच्या अलीकडे वेगळा आणि पलीकडे वेगळा नियम हे नियोजनबद्ध विकासासाठी योग्य नाही. त्यामुळे सातारा-देवळाई हे महानगरपालिकेत राहणे योग्य आहे. हद्दवाढीचा अधिकार महानगरपालिकेला आहे. मात्र, आता उशीर झाला असे वाटते; परंतु सातारा-देवळाई ही स्वतंत्र नगर परिषद होणे शहरासाठी चांगले नाही.
सी. एस. सोनी, निवृत्त शहर अभियंता, मनपा.

आयोगाने म्हणणे फेटाळले तर
सातारा-देवळाई नगर परिषद रद्द करून त्याचा समावेश महानगरपालिकेत करण्याचा प्रस्ताव कॅबिनेटने मंजूर केल्यानंतर तो आयोगाने फेटाळला तर या दोन्हीही निवडणुका ठरल्याप्रमाणे एप्रिल महिन्यात होतील. आजूबाजूला दोन स्वायत्त संस्था राहतील. मात्र, शासनाला वाटले तर निवडणुकीनंतर नगर परिषद बरखास्त करून पुन्हा ती पालिकेत समाविष्ट केली जाऊ शकेल.

महापालिकेत येण्याचे फायदे
सातारा-देवळाई महानगरपालिकेत समाविष्ट झाले तर नियोजनबद्ध विकास शक्य होईल. महानगरपालिकेचा निधी तिकडे वळता करता येईल. शहराची लोकसंख्या ५० हजारांनी वाढणार असल्याने पालिकेचा दर्जा पुन्हा क वरून ड होणार नाही. नवीन परिसर पालिकेत आल्यानंतर शासनाकडून काही निधी मिळू शकतो. कर्मचा-यांचे पगार वेळेत होतील.

काय होतील तोटे?
नगर परिषदेकडे निधीची कमतरता असते. त्यामुळे कर्मचा-यांचे पगार महिनोन् महिने होत नाहीत. महानगरपालिकेचे तसे नाही. जास्तीत जास्त १० ते १५ दिवस पगाराला उशीर होतो.मनपा झाल्यास मालमत्ता कर काहीसा जास्त असेल. ज्यांना नगरराध्यक्ष व्हायचे आहे त्यांचे स्वप्न भंगेल; पण राजकारणात काहीही होऊ शकते, त्यामुळे नगराध्यक्ष होता नाही आले तर कदाचित शहराचे महापौर होता येईल.

साता-याचा समावेश झाल्यास आराखडा मोठा होईल
सध्या शहराच्या विकास आराखड्याचे काम सुरू आहे. सातारा-देवळाईचा शहरात समावेश झाल्यास विकास आराखडा आणखी मोठा करावा लागेल. त्यामुळे या भागात मोठे रस्ते होतील. उद्यान, मैदाने यासाठी जागा राखून ठेवताना पूर्ण शहराचा विचार होईल. मात्र, नगर परिषद असल्यास हे नियोजन करताना फक्त दोनच खेड्यांचा विचार होईल.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
महापालिकेने मंजूर केलेला सातारा-देवळाई आपल्या हद्दीत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे. मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो ठेवला जाईल.
रामदास कदम, पालकमंत्री

भाजपचे असे काही मत नाही
सातारा-देवळाईची नगर परिषदच असावी, अशा मताचा भाजप नाही. महानगरपालिकेत समावेश झाला तर या परिसराचा नियोजनबद्ध विकास होईल. त्यामुळे आम्हीही याच मताचे आहोत. त्यामुळे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
अतुल सावे, आमदार, भाजप

हा औचित्याचा भंग ठरू शकतो
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ती स्थगित करून सातारा-देवळाईचा समावेश महानगरपालिकेत करणे हा फक्त औचित्याचा भंग ठरू शकतो. मात्र, त्यात तांत्रिक अडचण येईल, असे वाटत नाही.
अॅड. प्रदीप देशपांडे,
ज्येष्ठ विधिज्ञ.