आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या व्यापारी संकुलात गाळा घेण्यासाठी 57 लाखांची बोली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - टीव्ही सेंटर मैदानावर उभारण्यात येणार्‍या मनपाच्या व्यापारी संकुलात गाळा घेण्यासाठी झालेल्या सोडतीत चक्क 57 लाखांपर्यंत बोली गेल्याने ही दुकाने सुशिक्षित बेरोजगारांच्या आवाक्याबाहेर असल्याचे स्पष्ट झाले. राजकीय नेते, त्यांचे नातेवाईक यांनी हे गाळे बळकावण्यासाठी अर्ज केले असून सोडतीतून त्यांना किती गाळे मिळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टीव्ही सेंटरचे मैदान ही अतिशय मोक्याची जागा असून दोन मुख्य रस्त्यांना या मैदानांच्या दोन बाजू येतात. या परिसरात आता दुकानांसाठी जागा राहिली नसल्याने मनपाने तेथे मैदानाभोवती व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. येथे 50 गाळे काढण्यात येणार असून त्यांची सोडत आज मौलाना आझाद रिसर्च सेंटरमध्ये काढण्यात आली.

मूळ आधारभूत किंमत 10 लाख ठेवली असताना बोलीच्या वेळी ही किंमत वाढतच गेली. खुल्या संवर्गाच्या सोडतीत सर्वाधिक 57 लाख रुपयांची बोली लागली तर कमीत कमी 22 लाख रुपयांची बोली आहे. मात्र, हा आकडा एवढा वाढल्याने मनपाचा गाळा घेऊन आपला व्यवसाय सुरू करू इच्छिणार्‍या होतकरू मध्यमवर्गीय तरुणांचा हिरमोडच झाला. व्यापारी, राजकीय नेते, त्यांचे नातेवाईक या सर्वांनी गणित मांडून या सोडतीत उडी घेतल्याने आता हे गाळे सामान्य तरुणांना मिळणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

सोडतीत कुणाला गाळे मिळाले हे यादी झाल्यावरच समजणार आहे. या सोडतीच्या वेळी मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त किशोर बोरडे, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांची उपस्थिती होती.

‘दिव्य मराठी’शी बोलताना आयुक्तांनी सोडतीला मिळालेल्या प्रतिसादाबाबत समाधान व्यक्त केले. आजची सोडत शांततेत व सुरळीत झाल्याचे त्यांनी सांगितले.

50 गाळ्यांसाठी मनपाकडे आले 650 अर्ज
मनपाने या 50 गाळ्यांसाठी अर्ज मागवले होते. त्यास तुडुंब प्रतिसाद मिळाला. 650 अर्ज मनपाकडे आले. 50 पैकी 31 गाळे खुल्या संवर्गासाठी, 15 महिलांसाठी, 3 अनुसूचित जाती-जमातींसाठी व 1 अंध अपंगांसाठी आहे. त्यानुसार सोडती काढण्यात आल्या. या गाळ्यांतून 4 कोटी रुपये जमा होतील, अशी मनपाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात आलेली बोली पाहता मनपाचे उत्पन्न 12 कोटी रुपये होणार आहे. याचाच अर्थ मनपाला चक्क आठ कोटींची लॉटरी लागली आहे.