आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Tax Audit Issue Aurangabad

करदात्यांचे 15 लाख रुपये खाल्ले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तुम्ही प्रामाणिक करदाते असाल आणि नियमित कर भरत असला तरी तुमचा कर मनपाच्या तिजोरीतच जातो याची खातरजमा करावी लागणार आहे. वॉर्ड इच्या पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुलीचे मागील सहा वर्षांचे ऑडिट केल्यानंतर नागरिकांनी भरलेल्या करातील तब्बल 15 लाख रुपयांची रक्कम मनपाच्या तिजोरीत जमाच झाली नसल्याचे उघड झाले आहे. या रकमेचा अपहार करण्यात आल्याचा स्पष्ट ठपका मुख्य लेखा परीक्षकांनी ठेवला असून हा उपद्व्याप करणार्‍या मनपाच्या अधिकारी - कर्मचार्‍यांवर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. मुख्य लेखा परीक्षक मो. रा. थत्ते यांच्या नेतृत्वाखालील टीमने वॉर्ड इ चे हे ऑडिट केले. 2006 ते 2012 या सहा वर्षांच्या हिशेबांची तपासणी केल्यावर त्यांना एकापाठोपाठ एक धक्के बसतच गेले.

काय सापडले ऑडिटमध्ये
करवसुलीसाठी मनपाच्या दोन प्रकारच्या पावत्या असतात. एक धनादेश पावती व दुसरी रोख पावती. एखाद्या नागरिकाने धनादेशाच्या माध्यमातून कर दिला की त्याला धनादेश पावती दिली जाते व धनादेश वटल्यावर रोख पावती दिली जाते व व्यवहार पूर्ण होतो. जोपर्यंत रोख भरण्याची पावती मिळत नाही तोपर्यंत तो पैसा मनपाच्या तिजोरीत जात नाही. मात्र, येथेच सगळा घोळ आहे. वॉर्ड इमध्ये नागरिकांकडून वसुली करताना काही नागरिकांकडून चेक घेतले. त्यांनी नंतर रोख रक्कम भरली तर त्यांना धनादेश पावती देण्यात आली. या शिवाय इतर नागरिकांकडून सर्रास कर वसूल करीत चक्क धनादेशाची पावती दिली. धनादेश पावती म्हणजे कर मनपाच्याच तिजोरीत पोहोचल्याची पावती नसल्याने ही सारी रक्कम परस्पर लाटण्यात आल्याचा ठपका ऑडिटमध्ये ठेवण्यात आला आहे.

चेक ची नोंदच नाही
धनादेश पावतीद्वारे रक्कम वसूल करीत संबंधित नागरिकांकडून कराची पावती न फाडता 2 लाख 14 हजार 184 रुपयांचा भरणा मनपा तिजोरीत झाला नसल्याचे धक्कादायक सत्य उघड झाले आहे. हे धनादेश मनपाच्या निधीत जमा झाल्याचा कुठेही उल्लेख नाही. तसेच हे धनादेश मनपाच्या नावाने दिले होते की बेअरर याचीही नोंद नाही. ऑडिटसाठी हे धनादेश मागितले असता तेही मिळाले नाहीत.

आणखीही घोळ
या शिवाय नळ कनेक्शनधारकांकडून थकबाकी वसूल न करताच ते कनेक्शन बंद केल्याचे, पाणीपट्टी रजिस्टरमध्ये थकबाकी नोंदलेली असताना मागणी रजिस्टरमध्ये नोंदच नसणे असे अनेक प्रकार घडले आहेत. प्रत्यक्षात मागील रजिस्टरवरील थकबाकी पुढील मागणी रजिस्टरमध्ये कॅरी फॉरवर्ड होणे आवश्यक असते. नेमके तेच झालेले नाही.

अनेकांवर कारवाईच नाही
या संदर्भात अधिक माहिती घेतली असता करवसुलीत घोळ घालणार्‍या कर्मचारी व अधिकार्‍यांवर आतापर्यंत कधीच कारवाई न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. आतापर्यंत अशा प्रकारांमध्ये दोषी आढळलेल्या 8 ते 10 कर्मचार्‍यांच्या चौकशा अनेक वर्षांपासून सुरूच आहेत. त्यात कोणावरही कारवाई झालेली नाही. नगरसेवक समीर राजूरकर म्हणाले की, जनतेकडून कर वसूल करून त्याचा मनपाच्या तिजोरीत भरणा न करणार्‍या कर्मचार्‍यांवर तातडीने कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा झाली तरच जनतेच्या पैशावर डल्ला मारणार्‍यांना धाक वाटेल.

पावती पुस्तकेही झाली गायब
मनपाच्या भांडार विभागाने वॉर्ड कार्यालयाला धनादेश पावत्यांची 100 पुस्तके दिली होती. ऑडिटच्या वेळी संबंधित विभागांनी फक्त 43 पावती पुस्तकेच उपलब्ध करून दिली. उरलेल्या 57 पावती पुस्तकांचे काय झाले ते आजतागायत समोर आलेले नाही.

एक कोटीच्या वर असू शकतो घोटाळा
या प्रकरणानंतर करवसुलीची यंत्रणाच संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. स्थायी समिती सभापती नारायण कुचे म्हणाले की, इतर पाच वॉर्ड कार्यालयांतील लेखापरीक्षण झाल्यास एक कोटीपर्यंतचा घोटाळा उघडकीस येऊ शकतो.

ऑडिटमधील प्रमुख आक्षेप
0 मागणी रजिस्टरचा ताळेबंद जुळत नाही. प्रमाणित ताळेबंद न देता अंदाजे रक्कम दाखवून लेखा परीक्षणाला चुकीचा ताळेबंद दिला.
0 कर निर्धारण व संकलन विभागाने वॉर्ड कार्यालयाला पाठवलेल्या समरी रजिस्टरवरून मागणी नोंदवहीत नोंद न घेतल्याने मालमत्ताधारकांना नोटीसच पाठवली जात नाही. त्यामुळे मनपाचे 4 लाख 89 हजार 593 रुपयांचे नुकसान झाले आहे.
0 मालमत्ता, पाणीपट्टी करापोटी व सर्वसाधारण पावती पुस्तकांच्या आधारे वसूल करण्यात आलेल्या रकमांची नोंद घेताना बेरजेत तफावत, पावतीची रक्कम वसूल करून कमी भरणा करणे, बेरजेत हातच्याचे घोळ घालून कमी रक्कम दाखवणे असे प्रकार झाले.
0 100 पैकी गायब 57 धनादेश पावती पुस्तकांचा वापर करून किती वसुली झाली हे स्पष्ट होत नाही.
0 धनादेश पावती पुस्तकात मूळ प्रत व स्थळ प्रत दोन्हीही उपलब्ध नाहीत असे अनेक प्रकार आढळले.
0 पाणीपट्टीधारकाकडे शिल्लक असताना त्यांच्याकडील थकबाकी डिमांड रजिस्टरवर निरंक दाखवण्यात आली.
0 कॅश रजिस्टरला पान क्रमांक नाहीत, लिहिताना झालेल्या खाडाखोडी प्रमाणित करण्यात आलेल्या नाहीत.