आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचा करभरणा लवकरच ऑनलाइन !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - करभरणा करण्यासाठी वॉर्ड कार्यालयांत किंवा बँकांत खेटे मारण्यापासून नागरिकांची सुटका करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. लवकरच मालमत्ता कर, पाणीपट्टी व एलबीटी नेट बँकिंगच्या माध्यमातून नागरिकांना करभरणा करता येणार आहे. याच आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणून मनपा 20 मेपर्यंत टेलर मशीनद्वारे कर भरता येणारे किऑस्क सुरू केले जाणार आहे.

मनपाच्या करांचा भरणा करण्यासाठी नागरिकांना मनपाची वॉर्ड कार्यालये गाठावी लागतात किंवा बँकांत रांगा लावाव्या लागतात. कर भरणार्‍या नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मनपाने निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून पेमेंट गेट वे ही सुविधा लवकरच सुरू केली जाणार असून त्यातून नागरिकांना मालमत्ता कर, पाणीपट्टी व एलबीटी हे कर नेट बँकिंगच्या माध्यमातून घरबसल्या भरता येणार आहेत. याशिवाय करभरणा करण्यासाठी किऑस्कची सुविधा 20 मेपासून सुरू केली जाणार असून तेथे मालमत्ता, एलबीटी, पाणीपट्टी टेलर मशीनद्वारे भरता येणार आहे. यासाठी लागणारा सर्व डेटाबेस महानगरपालिका उपलब्ध करून देईल, असे मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.

एटीएमचे उद्घाटन
महानगरपालिका इमारतीच्या परिसरात एचडीएफसी बँकेच्या एटीएमचे शुक्रवारी आयुक्त डॉ. कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आतापर्यंत मनपाच्या सर्व कर्मचार्‍यांचे पगार वेगवेगळ बँकांत व्हायचे. त्यामुळे पगाराला विलंब होत असे. आता सर्व कर्मचार्‍यांची खाती एचडीएफसी बँकेत उघडण्यात आली असून तेथेच पगार जमा करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात वर्ग 1 ते वर्ग 3च्या कर्मचार्‍यांची खाती उघडण्यात येत असून पुढील टप्प्यात वर्ग 4 च्या कर्मचार्‍यांची खाती सुरू करण्यात येतील. त्यांच्या सोयीसाठी एटीएम केंद्र सुरू करण्यात आले आहे. या वेळी उपमहापौर संजय जोशी, सभागृह नेता सुशील खेडकर, एचडीएफसी बँकेचे राहुल पांडे यांची उपस्थिती होती.