आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Water Bill Issue In Marathi

13 वर्षांपूर्वी कापलेल्या नळाची पाणीपट्टी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अधिकार्‍यांच्या ‘चर्चा करा आणि अहवाल द्या’ अशा शेर्‍यांचा काडीचा फायदा होत नाही. उलट 2002 मध्ये सर्व रक्कम भरून बंद केलेल्या नळाची 26 हजार रुपयांची पाणीपट्टी रद्द करा, अशी विनवणी करणार्‍या रिक्षाचालकाला मनपात कामधंदे सोडून चकरा माराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे आयुक्तांनी शेरा लिहिल्यावरही मनपाचे कर्मचारी आमच्याकडे येऊ नका, काय करायचे ते करून घ्या, अशा भाषेत दटावत आहेत.

मनपाची गेंड्याची कातडी असलेली यंत्रणा सर्वसामान्य माणसाला कसे छळते, याचे हे उदाहरण आहे. स्थायी समिती सभापती नारायण कुचे यांच्या वॉर्डातील संघर्षनगरात राहणार्‍या प्रदीप देविदास कळगावकर यांनी डिसेंबर 2002 मध्ये त्यांच्या घराचे अर्धा इंची नळ कनेक्शन बंद केले. त्यासाठी 14 नोव्हेंबर 2002 रोजी सर्व पाणीपट्टी भरून म्हणजे 3 हजार 720 रुपये भरून टाकले. 3 डिसेंबर 2002 रोजी हे नळ कनेक्शन बंद करण्यात आले, पण तरीही मनपा दरवर्षी न चुकता त्यांना पाणीपट्टीची बिले पाठवत राहिली. प्रत्येक वेळी अर्जफाटे करून माझे नळ कनेक्शन कट केले आहे, बिल नका देऊ, असे विनवणी करून सांगायचे. पुन्हा दुसर्‍या वर्षी तेच. मागील तेरा वर्षांपासून हा प्रकार सुरू असून आता तर मनपाने त्यांच्या हातात तब्बल 26 हजार रुपयांचे बिल दिले.

बिल भरा नाही तर कारवाई करू, असा इशाराही वर दिला. कळगावकर पाणीपुरवठय़ाचे उपअभियंता ख्वाजा यांना भेटले. त्यांनी त्यांच्या विभागातील मोटे व गोरे यांच्याकडे त्यांना पाठवले. गोरे यांनी यात काहीही होत नाही, असे सांगत अपमानास्पद वागणूक दिली. अखेर या महिन्यात 14 तारखेला कळगावकर थेट आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना भेटले. आयुक्तांनी त्यांच्या अर्जावर त्वरित कार्यवाही करून अहवाल द्या, अशा सूचना पाणीपुरवठा उपअभियंत्यांना दिल्या. कळगावकर यांनी ख्वाजा यांची भेट घेतली असता त्यांनी गोरे यांच्याकडे बोट दाखवत आता माझ्याकडे येऊ नका, असे सुनावले.